मुंबई : पश्चिम उपनगरांत एकही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्याने जोगेश्वरी येथील इस्माईल युसूफ महाविद्यालयात अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यासाठी महिनाभरात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मुंबई विद्यापीठ आणि तंत्रशिक्षण संचालनालयास दिले आहेत. तसेच याच महाविद्यालयात अभियांत्रिकी, आॅर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट आणि फार्मसी महाविद्यालयांचे शैक्षणिक संकुल उभारण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यासाठी पाच जणांची समिती गठित करण्यात आली आहे.जोगेश्वरी येथील इस्माईल युसूफ महाविद्यालयात एकाच छत्राखाली विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शैक्षणिक संकुल उभारण्यात येणार आहे. याबाबत राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शुक्रवारी महाविद्यालयात आढावा बैठक बोलावली होती. महाविद्यालयातील प्रस्तावित शैक्षणिक संकुलामध्ये अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी महाविद्यालयाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी पाच जणांची समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती एक महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे. यासह मराठी भाषा भवन, सेंट्रल लायब्ररी आणि एक हजार क्षमतेचे बहुद्देशीय सभागृह आराखडा तयार करण्याच्या सूचनाही या वेळी वायकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.इस्माईल युसूफ महाविद्यालयाच्या परिसरात मुलींचे वसतिगृह सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी आवश्यक बांधकाम तसेच अन्य कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही वायकर यांनी पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. (प्रतिनिधी)
शैक्षणिक संकुलासाठी समिती
By admin | Updated: February 14, 2015 04:22 IST