औरंगाबाद : बीअर व मद्यनिर्मिती उद्योगांचे पाणी किमान दोन महिन्यांसाठी तातडीने बंद करण्याची मागणी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली आहे. भीषण दुष्काळाचा सामना करीत असलेला मराठवाडा हा बीअर व मद्यनिर्मितीचे केंद्र म्हणून पुढे येत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.बीअर व मद्यनिर्मिती करणाऱ्या औरंगाबादेतील १२ उद्योगांना दररोज ४० लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर सर्वत्र खळबळ उडाली. सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला. पाऊस पडेपर्यंत येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत या उद्योगांचे पाणी बंद करण्याची मागणी त्यांनी केली. अशा उद्योगांकडून मिळणाऱ्या महसुलाचा मोह राज्य सरकारला सुटत नसल्याने त्यांचे पाणी बंद करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहेत. भरमसाठ पाण्याचा वापर करणारे बीअर व मद्यनिर्मिती उद्योगच मुळात अनाठायी, अवाजवी आहेत. दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्याची ओळख दारूबनविण्याचे केंद्र, अशी होत आहे. मराठवाड्याची ही क्रूरचेष्टाच नव्हे का? या उद्योगांतून फारशी रोजगारनिर्मिती होत नसल्याने त्यांचे पाणी तातडीने बंद करावे. रसायने, कागदनिर्मिती करणाऱ्या प्रक्रिया उद्योगांचीही तातडीने पाणीकपात करणे गरजेचे आहे.- प्रा. एच. एम. देसरडा, अर्थतज्ज्ञ्>> पिण्याचे पाणी, शेती आणि नंतर उद्योग, असा जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे; परंतु शेतीसाठी या धरणातील पाण्याचा वापर कधीचाच बंद झाला आहे. घोटभर पाण्यासाठी मराठवाड्यातील ग्रामीण जनतेला भटकंती करावी लागत असताना मद्यनिर्मिती उद्योगांना भरमसाठ पाणी उपलब्ध करून दिले जाते, हेच चुकीचे असून, त्यांचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याची गरज आहे.- आ. हर्षवर्धन जाधवबीअर व मद्यनिर्मिती कारखान्यांकडून होणाऱ्या पाणी वापराची राज्य शासनाने योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे. या उद्योगांना नेहमीच मुबलक पाणी मिळत गेल्याने पाणी बचतीकडे त्यांचे दुर्लक्षच झाले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून या उद्योगांनी पाणी बचतीचे उपाय योजावेत. तसेच फेरवापरावरही भर द्यावा.- हरिभाऊ बागडे, अध्यक्ष विधानसभाटंचाईच्या काळात बीअर व मद्यनिर्मितीच नव्हे, तर सर्व प्रक्रिया उद्योगांचे पाणी तातडीने बंद करण्याची गरज आहे. या उद्योगांची पाणी कपात केल्याचे कागदोपत्री दाखविले जात असले, तरी परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्या वीज देयकात सातत्याने वाढ होत आहे. याचाच अर्थ पाणीकपात नावालाच असल्याचे स्पष्ट होते. बीअर व मद्यनिर्मिती कारखान्यांनी पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला असून, पाणी बंद केले तरी त्यांच्या उत्पादनावर कसलाही परिणाम होणार नाही.- जयाजी सूर्यवंशी, अन्नदाता शेतकरी संघटना
मद्यनिर्मिती उद्योगांचे पाणी तातडीने बंद करा
By admin | Updated: April 9, 2016 03:08 IST