चेतन ननावरे, मुंबईरेशनिंग दुकानदारांच्या रॉकेल कोट्यात केलेली कपात आणि एपीएल धारकांच्या बंद केलेल्या रेशनिंगमुळे दुकानदार तोट्यात जात आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये जीवनावश्यक गोष्टींचा काळाबाजार सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात काळाबाजार करणाऱ्या दुकानांवर कारवाई करत विविध २७ प्रकरणांत गुन्हे नोंद केले आहे.प्रशासनाने जानेवारी महिन्यात केलेल्या कारवाईत ४७२ दुकानांची तपासणी केली होती. त्यात २८ स्वस्त धान्य दुकानांत केलेल्या तपासणीदरम्यान ७ दुकानदार दोषी आढळल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक श्वेता सिंघल यांनी दिली. सिंघल यांनी सांगितले की, सात प्रकरणांत प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. तरी गुन्हे दाखल केलेली दुकाने सील करून तेथील कार्डधारकांना नजीकच्या दुकानांत रेशनिंग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत मुंबई रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नवीन मारू म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या मुंबईकरांचे धान्य थांबवले आहे. शिवाय रॉकेलच्या कोट्यातही प्रशासनाने सुमारे ३८ टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे दुकानांवर येणाऱ्या ग्राहकांची संख्या रोडावली असून दुकानाचे भाडे आणि कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठीही दुकानदारांकडे पैसे नाहीत. परिणामी प्रशासन दुकानदारांना भ्रष्टाचार करण्यास भाग पाडत असल्याचे ते म्हणाले.
काळ्याबाजाराविरोधात मोहीम
By admin | Updated: February 14, 2015 04:20 IST