मुंबई : कामाठीपुरा या मुंबईतील रेडलाईट परिसरात ती लहानाची मोठी झाली. आजूबाजूला नरकयातना भोगणाऱ्या सेक्सवर्करची दु:ख तिने जवळून पाहिली आणि त्यांना त्यातून बाहेर काढत आत्मसन्मानाचे जीवन जगण्याची संधी देण्याचा विडाच उचलला. तिच्या या कामगिरीची दखल घेत न्यूयॉर्कच्या बार्ड विद्यापीठाने तिला उच्चशिक्षणाची संधी दिली आहे. कामाठीपुरा ते न्यूयॉर्क असा प्रवास करणाऱ्या या युवतीचे नाव आहे श्वेता कट्टी. तिच्या या धाडसाचे कौतुक सातासमुद्रपल्याड होत आहे़ रेड लाईट एरियातील महिलांच्या उत्कर्षासाठी लढणाऱ्या श्वेता कट्टीची संयुक्त राष्ट्राच्या ह्ययुवा शौर्य पुरस्काराह्णसाठी नुकतीच निवड करण्यात आली़ पण कामाठीपुरा ते न्यूयॉर्क हा तिचा प्रवास एवढा सहजसोपा कधीच नव्हता़ नवऱ्याच्या जाचाला कंटाळून बेळगावातील खेड्यातून तिच्या आईने श्वेतासह मुंबई गाठली़ डोक्यावर छत शोधत असताना कामाठीपुरात त्यांना आश्रय मिळाला़ मुंबईतील या बदनाम गल्ल्यांमध्ये तिचे बालपण गेले़ खेतवाडी पालिका शाळा व त्यानंतर गिरगावच्या चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये तिने आपले शिक्षण पूर्ण केले.जवळच्या एका कारखान्यात तिची आई नोकरीला जाऊ लागल्यानंतर या महिलांनीच तिचा सांभाळ केला़ त्यामुळे त्यांच्यात वावरताना त्यांचे दु:खही ती जवळून पाहत होती़ त्याच क्षणी या महिलांच्या उत्कर्षासाठी झटण्याचा तिने निर्धार केला़ तिच्या या निश्चयाला रेड लाईट एरियामध्ये काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेची साथ मिळाली़
या संस्थेबरोबर तिने नेपाळ आणि झारखंडच्या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन तेथील देहविक्री करणाऱ्या महिलांचे समुपदेशन केले़ त्याचवेळी आपल्या मुंबईतील त्या मैत्रिणींच्या मानसिक शांतीसाठी समुपदेशन केंद्र उभारण्याचा विचार तिने मनोमन पक्का केला होता़ अशातच न्यूयॉर्कच्या बार्ड विद्यापीठात तिला उच्चशिक्षणाची संधी चालून आली़ या विद्यापीठात तिने मानसशास्त्र विषयातून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर कामाठीपुरातील महिलांच्या उत्कर्षासाठी काम करण्याचा तिचा विचार आहे़ श्वेताच्या या कार्याची दखल संयुक्त राष्ट्रानेही घेतली आहे़ म्हणूनच अवघ्या १९ व्या वर्षी तिला युथ करेज अॅवॉर्डने गौरविण्यात येत आहे़ प्रतिकूल परिस्थितीला मात देऊन महिलांचा आत्मसन्मान आणि शिक्षणासाठी कार्य केल्याबद्दल हा मान तिला देण्यात येत आहे़