मुंबई : राष्ट्रीय पातळीवर राज्यातील कलावंतांनी घवघवीत यशाची मालिका सुरू ठेवली असल्याचे कौतुकाचे उद्गार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांच्या सत्काराप्रसंगी काढले. ६१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपट कलावंतांचा सत्कार सोहळा आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला होता. या कौतुक सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, मराठी चित्रपटाचा लौकिक राष्ट्रीय पातळीवर हे कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आहेत. आशयघन विषयाची मांडणी, सामाजिक सलोखा याचे चित्रण चित्रपटातून दिसत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दादासाहेब फाळके यांनी लावलेल्या या रोपट्याचे विशाल वृक्षात झालेले रूपांतर आपल्याला पाहावयास मिळते आहे. मराठी चित्रपटसृष्टीने या माध्यमातून करमणुकीबरोबरच सामाजिक शिक्षण देण्याची प्रभावी ताकद निर्माण केली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी सांगितले. प्रारंभी सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी प्रास्ताविक करून सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. या वेळी ‘फँड्री’ चित्रपटासाठी प्रथम पदार्पणाचा उत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार नागराज मंजुळे (१ लाख आणि प्रशस्तिपत्र), इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्स प्रा.लि. यांच्या ‘तुह्या धर्म कोनचा’ या चित्रपटाला उत्कृष्ट सामाजिक चित्रपट पुरस्कार (५० हजार रुपये व प्रशस्तिपत्र) आणि याच चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश मनवार यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार (प्रत्येकी ५० हजार आणि प्रशस्तिपत्र). ‘अस्तु’ चित्रपटासाठी उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री अमृता सुभाष (१ लाख आणि प्रशस्तिपत्र), ‘फँड्री’ चित्रपटासाठी उत्कृष्ट बालकलाकार सोमनाथ अवघडे (१ लाख आणि प्रशस्तिपत्र), ‘तुह्या धर्म कोनचा’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार बेला शेंडे (१ लाख आणि प्रशस्तिपत्र), ‘अस्तु’ चित्रपटाच्या उत्कृष्ट संवादासाठी सुमित्रा भावे (१ लाख आणि प्रशस्तिपत्र), ‘यलो’ चित्रपटासाठी विशेष परीक्षक पुरस्कार निर्माता विवाइन इन आणि दिग्दर्शक महेश लिमये (प्रत्येकी ५० हजार आणि प्रशस्तिपत्र), मराठी भाषेतील उत्कृष्ट चित्रपट ‘आजचा दिवस माझा’ निर्माता व्हाइट स्वान प्रोडक्शन आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी (प्रत्येकी ५० हजार आणि प्रशस्तिपत्र), ‘यलो’ चित्रपटासाठी विशेष उल्लेखनीय चित्रपट पुरस्कार तसेच याच चित्रपटासाठी बालकलाकार गौरी गाडगीळ आणि संजना राय (प्रत्येकी १ लाख आणि प्रशस्तिपत्र) देऊन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कलाकारांना गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)
कलावंतांनी यशाची मालिका सुरू ठेवली
By admin | Updated: May 8, 2014 02:36 IST