पुणे : कुख्यात अप्पा लोंढेच्या खून प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी १५ महिन्यांपासून फरारी असलेल्या गुन्हेगाराला अटक केली असून, त्याला विशेष न्यायाधीश ए. जी. बिलोलीकर यांनी २० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. लोंढेचा २८ मे २०१५ रोजी पहाटे ऊरुळी कांचन येथील डाल वस्तीजवळ धारदार हत्यारांनी वार तसेच गोळीबार करून खून केला होता.प्रवीण मारुती कुंजीर (वय ३२, रा. वळपी, उरूळी कांचन) असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी गोरख ऊर्फ गोरक्ष बबन कानकाटे (वय ४३, रा. कोरेगाव मूळ रा. इनामदारवस्ती, हवेली) आणि रवींद्र शंकर गायकवाड (वय ३६, रा. उरुळी कांचन), संतोष भीमराव शिंदे (वय ३४), नीलेश खंडू सोलनकर (वय ३०), राजेंद्र विजय गायकवाड (वय२४), आकाश सुनील महाडिक (वय २०), नितीन महादेव मोगल (वय २७), विष्णू यशवंत जाधव (वय ३७), नागेश लक्ष्मण झाडकर (वय २७) आणि मनी कुमार ऊर्फ चंद्रा ऊर्फ अण्णा (वय ४५), विकास प्रभाकर यादव (वय ३१) अण्णा ऊर्फ बबड्या किसन गवारे (वय ३५, रा. मेमाणेवाडी, ता. दौंड), प्रमोद ऊर्फ बापू काळूराम कांचन (वय ३७), सोमनाथ काळूराम कांचन (वय ४२, दोघेही रा. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) यांच्यावर आत्तापर्यंत मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात वैभव प्रकाश ऊर्फ अप्पा लोंढे (वय २२) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या प्रकरणामध्ये लोंढेचा मुलगा आणि फिर्यादी वैभव लोंढे यांच्या मागणीवरून विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. विकास शहा यांची नेमणूक करण्यात आली होती. कुंजीरला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. बचाव पक्षाचे वकील अॅड. सुचित मुंदडा, अॅड. दादासाहेब लोंढे, केतज जाधव, अॅड. दीपाली गायकवाड, अॅड. सूरज वाणी यांनी विरोध केला. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरीत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली.>अप्पा लोंढेच्या भावाचा गोरख कानकाटे आणि त्याच्या साथीदारांनी २००२ मध्ये खून केला होता. या प्रकरणात कानकाटे आणि त्याच्या सहकाऱ्यांना शिक्षाही झालेली होती. या खून प्रकरणात अप्पा लोंढे साक्षीदार होता. उच्च न्यायालयामधून जामीन मिळवून बाहेर आलेल्या कानकाटे याने अन्य अटक आरोपींच्या मदतीने लोंढेचा खून केला होता. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मोक्का लावण्यात आला होता.
लोंढे खून प्रकरणातील फरारीला अटक
By admin | Updated: August 15, 2016 01:12 IST