मुंबई : एखाद्या पुरुषाने त्याची पहिली पत्नी हयात असताना दुसरे लग्न केले, तर अशी दुसरी स्त्री कायद्याच्या काटेकोर निकषांवर त्या पुरुषाची लग्नाची बायको होत नाही, तरीही त्या पुरुषाने सांभाळ करण्यास नकार दिल्यास, अशी दुसरी ‘पत्नी’ही दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १२५ अन्वये त्या पुरुषाकडून पोटगी मिळण्यास पात्र ठरते, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.हा निकाल देताना न्या. एम. एस. सोनक यांनी म्हटले की, ज्यांनी सांभाळ करायचा त्यांनीच वाऱ्यावर सोडल्यावर निराधार स्त्रिया, मुले अथवा वृद्ध आई-वडील यांना आधार मिळावा, या कल्याणकारी हेतूने कायद्यात ही तरतूद करण्यात आली आहे.त्यामुळे यानुसार पोटगी मिळण्यासाठी, बाधीत स्त्रीचा संबंधित पुरुषाबरोबर झालेला विवाह अवैध असला, तरी तिच्या पोटगीच्या हक्काला बाधा येत नाही. अशी स्त्री त्या पुरुषासोबत ‘पत्नी’ म्हणून दीर्घकाळ राहात असणे एवढेच यासाठी पुरेसे आहे. न्यायालय म्हणते की, पहिली पत्नी हयात असूनही दुसऱ्या स्त्रीशी ‘विवाहा’चे नाटक करणारा पुरुष आपल्याच लबाडीचा गैरफायदा घेऊ शकत नाही. कलम १२५ खालील पोटगी आणि ४९४ खालील दुसऱ्या विवाहाचा गुन्हा यांच्या सिद्धतेसाठी लागणाऱ्या पुराव्यांमध्ये फरक आहे. दुसऱ्या विवाहाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पहिला विवाह कायदेशीर होता, हे नि:संशयपणे दाखविणे गरजेचे असते. मात्र, कलम १२५ अन्वये पोटगीसाठी त्या दर्जाच्या पुराव्याची गरज नाही.न्यायालयाने असेही म्हटले की, स्त्री-पुरुषांचे विवाहविषयक दिवाणी हक्क आणि कलम १२५ अन्वये फौजदारी हक्क पूर्णपणे वेगळे आहेत. जिला कलम १२५ अन्वये पोटगी मंजूर झाली आहे, ती आपली लग्नाची बायकोच नाही, हे स्वतंत्र दिवाणी दाव्यात सिद्ध करून, अशी पोटगी रद्द करून घेऊ शकतो.कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील शांताबाई भीमराव बौचकर आणि तिची मुलगी जयश्री यांनी कलम १२५ अन्वये दाखल केलेली फिर्याद मंजूर करून, स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्यांनी भीमराव पांडू बौचकर याने या मायलेकींना दरमहा प्रत्येकी ५०० रुपयांची पोटगी द्यावी, असा आदेश मार्च २००४ मध्ये दिला होता. वर्षभराने कोल्हापूर सत्र न्यायालयाने जयश्रीची पोटगी कायम ठेवली, पण शांताबाईची पोटगी, तिचा भीमरावसोबत झालेला विवाह अवैध होता, या मुद्द्यावर रद्द केली. याविरुद्ध शांताबाई हिने केलेले अपील मंजूर करताना, न्या. सोनक यांनी हा निकाल दिला. (विशेष प्रतिनिधी)पितृत्वासोबत येते जबाबदारीशांताबाई ही आपली कायदेशीर पत्नी नाही, असा पवित्रा घेणाऱ्या भीमरावने जयश्री ही तिच्यापासून झालेली आपली मुलगी आहे, याचा मात्र इन्कार केला नव्हता. त्यामुळे तिच्या पितृत्वासोबत तिच्या आईला कलम १२५ अन्वये पोटगी देण्याची जबाबदारी भीमराववर आपोआपच येते, असे न्यायालयाने म्हटले.
दुसरी पत्नीही पतीकडून पोटगी मिळण्यास पात्र - हायकोर्ट
By admin | Updated: December 13, 2015 01:45 IST