प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद, दि. २० - गाढ झोपेत असताना प्रत्येकाला स्वप्न पडतात. ७० टक्के लोक असे आहेत की त्यांना कधी-कधी भयानक स्वप्न पडतात, त्यात कोणीतरी अज्ञात लोक आपणास बेदम मारत आहे, कोणीही आपल्या मदतीला धावून येत नाही, असे दिसते. ५० टक्के लोक म्हणतात की, अर्धांगवायू झाल्याने हात-पाय जड पडले, आपणास झोपेतून उठणेही कठीण झाले असे स्वप्नही आम्हाला पडतात, तर २० टक्के लोकांना आपला मृत्यू झाल्याचे भयानक स्वप्न पडत असतात, हे स्वप्नाच्या आभासी दुनियेतील सत्य सर्वेक्षणातून समोर आले आहे.
असे म्हणतात की, पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला दररोज ९० मिनिटे किंवा दोन तास स्वप्न पडते. काही वेळा स्वप्न हे खूप थेट असतात आणि त्यांचे अर्थही स्वप्न पडणाºयांना कळतात. पृथ्वीवर असा एकही व्यक्ती नसेल ज्यास आयुष्यात कधीच स्वप्न पडले नाही. मात्र,जे स्वप्न पडतात त्यातील ९६ टक्के स्वप्नांचा झोपेतून उठल्यावर विसर पडतो. धकाधकीच्या जीवनात वावरणा-या शहरवासीयांनी अधून-मधून किंवा नियमित कोणती स्वप्न पडतात. यावर सर्वेक्षण करण्यात आले. यात २१ ते ५५ वर्षे वयोगटातील लोकांकडून सर्वेक्षणाची प्रश्नपत्रिका भरून घेण्यात आली. यातून जे आभासी दुनियेतील सत्य बाहेर आले ते म्हणजे ७० टक्के लोकांना अधून-मधून भयानक स्वप्न पडत असल्याचे निदर्शनात आले. सर्वेक्षणात लोकांनी सांगितले की, आम्हाला भयानक स्वप्न पडतात कधी-कधी आम्ही दचकून झोपेतून जागे होतो. त्यात आपला कोणी तरीही पाठलाग करीत आहे, अज्ञात लोक आपणास बेदम मारत आहेत त्यावेळेस वाचविण्यासाठी कोणीही येत नाही. २० टक्के लोकांनी मृत्यू झाल्याचे स्वप्न पडल्याचे सांगितले. याशिवाय ८० टक्के लोकांना २० ते २५ वर्षांपूर्वी राहत असलेले जुने घर, जुन्या आठवणी आजही स्वप्नात येत असतात. सर्वेक्षणामधील ५० टक्के लोकांना त्यांच्या स्वप्नात जुने-नवीन मित्र-मैत्रिणी, परिचित दिसत असतात. मात्र, झोपेतून उठल्यावर स्वप्नाचा विसर पडल्याचेही बहुतांश जणांनी सांगितले.
५० टक्के लोकांना नियमित पडतात सेक्सची स्वप्न
सेक्स हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. तो स्वप्नात न आल्यास कसा चालेल. जो स्त्री-पुरुष इच्छा करतो, त्याच्याशी सेक्स करतानाचे स्वप्न पडत असल्याचे सर्वेक्षणात समावेश असणाºयांनी सांगितले. ५० टक्के लोक होते ज्यांना नियमित सेक्सची स्वप्न पडतात, तर ५० टक्के लोकांनी अधून-मधून सेक्सची स्वप्न पडत असल्याचे नमूद केले आहे. यात कॉलेजकुमारापासून ते ५५ वर्षांच्या ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत सर्वांनी सेक्सची स्वप्न पडत असल्याचा उल्लेख केला.
परीक्षेला उशिरा पोहोचल्याचे स्वप्न
सर्वेक्षणातील ८० टक्के लोक हे नोकरी करीत आहेत. मात्र, शालेय, महाविद्यालयीन परीक्षेची भीती अजूनही त्यांच्या मनात कायम आहे. परीक्षेत आपण उशिरा पोहोचलो. सर्व विद्यार्थ्यांचे निम्मे पेपर सोडविणे झाले आहे. आता आपण नापास होणार असे ६० टक्के जणांना अधून-मधून स्वप्न पडत असल्याचे सांगितले. काहींनी परीक्षेत उशिरा पोहोचल्याचे स्वप्न पडले पण नेमकी कोणती परीक्षा होती याचा त्यांना विसर पडल्याचेही नमूद केले.
भयानक स्वप्नाचा विसर
सर्वेक्षणात ७० टक्के लोकांनी भयानक स्वप्न पडत असल्याचे नमूद केले. मात्र, आपला अपघात झाला, भूत दिसल्यापासून ते कोणीतरी आपला खून करीत आहे इथपर्यंत भयानक स्वप्न त्यांनी पाहिले पण त्याचा झोपेतून उठल्यावर विसर पडल्याचाही उल्लेख त्यांनी केला.
मृत्यू झाल्याचेही स्वप्न
सर्वेक्षणात २० टक्के लोक असे होते की, त्यांना मृत्यू झाल्याचे स्वप्न पडल्याचे सांगितले. आपणास तिरडीवर झोपविले आहे आणि सर्वजण रडत आहेत, असेही स्वप्नात त्यांना दिसल्याचा उल्लेख त्यांनी केला. उर्वरित ८० टक्के लोकांनी मृत्यू झाल्याचे स्वप्न कधीच पडले नसल्याचे सांगितले.
मित्र-मैत्रिणी येतात स्वप्नात
सर्वेक्षणाचा फॉर्म भरून देणारे ५० टक्के असे होते की, त्यांच्या स्वप्नात अधून-मधून जुने, नवे मित्र-मैत्रिणी येतात. आपली त्यांच्याशी भांडणे झाली आहेत. आपल्यापासून ते दूर गेले आहेत,असे नकारात्मक स्वप्न जास्त पडल्याचे सर्वांनी सांगितले. २० टक्के लोकांना असे स्वप्न नियमित पडतात तर ३० टक्के लोकांनी स्वप्नात मित्र-मैत्रिणी येत नसल्याचा उल्लेख केला आहे.
मनी वसे ते स्वप्नी दिसे
मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले की, एक म्हण आहे की, मनी वसे ते स्वप्नी दिसे. अनेकांना स्वत:च्या मृत्यूबदलाचे स्वप्न पडतात, स्वत: बदलाचा न्यूनगंड, जगण्याची चिंता, सतत भीती वाटत राहिली तर तीच भीती स्वप्नात उतरते.
स्वप्नाचा वास्तवाशी नाही संबंध
पहाटेची स्वप्न खरी ठरतात, असे अनेकदा म्हटले जाते पण ते वैद्यकीयदृष्ट्या असत्य आहे. मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले की, मुळात स्वप्नाचा वास्तव जगाशी संबंध नाही. यामुळे पहाटेची स्वप्न खरी ठरतात यात काही तथ्य नाही. दिवसभरात आपणास काय कार्य करायचे आहेत हे मेंदू जागृतावस्थेत आपणास आठवण करून देत असतात. पहाटेच्या वेळी हळूहळू मेंदू जागृतावस्थेत येत असतो. त्यावेळी आपणास स्वप्न पडतात. एवढेच सत्य आहे. तसेच स्वप्नात साप, लहान मुले, नदी दिसणे यामुळे शुभ-अशुभ घडते या भाकड कथा असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
व्यक्तिमत्त्वानुसार पडतात स्वप्न
वैद्यकीयशास्त्रात व्यक्तिमत्त्वाचे मुख्य दोन प्रकार सांगितले आहेत.
टाईप ए- या प्रकारात व्यक्ती अतिचंचल असतात. सतत विचार करीत असतात. महत्त्वाकांक्षी असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट हवी असते. अशा व्यक्तींना जास्त प्रमाणात भीतिदायक स्वप्न पडतात. काही प्रमाणात स्वप्न लक्षात राहतात.
टाईप बी- या प्रकारातील व्यक्ती हरफनमौला असतात. महत्त्वाकांक्षीपणा कमी असतोे. अशा व्यक्तींना विलासी स्वप्न जास्त पडतात. लॉॅटरी लागली, लक्झरी कार खरेदी केली असे स्वप्न पडतात. स्वप्न या लोकांच्या लक्षात राहत नाही.
अर्धांगवायू झाल्याचे स्वप्न
सर्वेक्षणात ५० टक्के जणांनी आपणास कधी-कधी अर्धांगवायू झाल्याचे स्वप्न पडल्याचा उल्लेख केला आहे. झोपेत असतानाच आपण उठत आहोत व आपले हात-पाय जड पडले आहेत. काहीच हालचाल करता येत नाही, असे वाटते. विशेषत: दुपारी झोपल्यावर असे स्वप्न जास्त पडतात, असेही काहींनी सांगितले.
प्रतिक्रिया
४ टक्केच स्वप्न लक्षात राहतात
गाढ झोपेत ज्यास वैद्यकीयशास्त्रात ‘रॅपिड आय मूव्हमेंट’ असे म्हटले जाते. अशा अवस्थेत प्रत्येक व्यक्तीला स्वप्न पडत असतात. यातील ९६ टक्के स्वप्नांचा विसर झोपेतून उठल्यावर होतो तर ४ टक्केच स्वप्न लक्षात राहतात. विशेषत: पहाटेचे स्वप्न लक्षात राहतात, त्या वेळेस मेंदू जागृतावस्थेत येत असतो. त्यावेळेस स्वप्नातील अनेक कोडी सुटतात. ताण-तणाव,भीती यामुळे तसेच विचार मनात सतत येत असतात त्याचे प्रतिबिंब भयानक स्वप्न पडण्यात होते.
-डॉ. संदीप शिसोदे, मानसोपचारतज्ज्ञ
तणाव कमी करते स्वप्न
मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, स्वप्न पडणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. कारण, ज्यांना गाढ झोप लागते त्यांनाच स्वप्न पडतात. ज्यांचे आरोग्य चांगले आहे त्यांनाच गाढ झोप लागते. याचा अर्थ स्वप्न आपले आरोग्य सदृढ ठेवण्याचे काम करते. स्वप्नामुळे मनावरील तणावाचा निस्तारा होतो.