मुंबई : मुंबईत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या एकीकडे वाढत आहे, पण दुसरीकडे बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. मुंबईतील ७३ पैकी २८ रुग्ण हे स्वाइन फ्लूचे उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर स्वाइनच्या उपचारासाठी मुंबईत आलेल्या ३६ पैकी ११ जण बरे झाल्याचे पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी मुंबईत स्वाइन फ्लूचे नवीन १६ रुग्ण आढळले आहेत. तर मुंबई बाहेरून ३ नवे रुग्ण मुंबईत उपचारासाठी दाखल झाले आहेत. यामुळे मुंबई बाहेरून दाखल झालेल्या रुग्णांची संख्या आता ३६ वर पोहचली आहे. यापैकी १५ जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. उल्हासनगरहून ४६ वर्षीय पुरूषाला मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर कामोठेच्या ५४ वर्षीय महिलेस आणि ठाण्याच्या ५१ वर्षीय पुरुषास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांची ही प्रकृती स्थिर आहे. शुक्रवारी मुंबईत आढळलेल्या १६ रुग्णांमध्ये ४ लहान मुलांचा समावेश आहे. गोरेगाव पूर्व येथील २ वर्षीय मुलगी, मुंबई सेंट्रलचा ३ वर्षीय मुलगा, मुलुंड पश्चिमचा ३ वर्षीय मुलगा आणि वरळी येथील पाच वर्षीय मुलाला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. यापैकी तीन जणांना बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू असून, मुलुंडच्या मुलाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचबरोबरीने अंधेरी पश्चिम येथील ४० वर्षीय पुरुषास, ग्रॅण्ट रोड येथील ३३ वर्षीय महिलेस, विलेपार्ले येथील ६५ वर्षीय महिलेस आणि खार पश्चिम येथील ३० वर्षीय पुरुषास खासगी रुग्णालयात उपचारांसाठी रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. इतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
स्वाइन फ्लूचे २८ रुग्ण बरे झाले
By admin | Updated: February 14, 2015 04:22 IST