उरण : खोल समुद्रात मासेमारीस गेलेल्या करंजा, रेवस, कुलाबा, मुंबई आणि राज्यातील इतर १५ मच्छीमार बोटींवर शुक्रवारी देवगड समुद्रकिनार्यानजीक परप्रांतीय बोटींवरील कर्मचार्यांनी जोरदार हल्ला केला. शिशाचे गोळे, दगडांनी हल्ला चढविल्याने बोटींवरील ८ खलाशी जखमी झाले. या प्रकरणी देवगड पोलिसात परप्रांतीय मच्छीमारांविरोधात तक्रार करण्यात आली आहे. शुक्रवारी (१६) करंजा, रेवस, कुलाबा, मुंबई आणि राज्यातील इतर १५ मच्छीमार बोटी खोल समुद्रात मासेमारीस गेल्या होत्या. शासनाच्या नियमाप्रमाणे १२ नॉटिकल मैलावरील देवगड समुद्रकिनार्यानजीक या मच्छीमारी बोटी मासेमारी करीत होत्या. अचानक कर्नाटक राज्यातील मलपा बंदरातील ७०-८० मच्छीमार बोटी मच्छीमारांवर चाल करून आल्या. या परप्रांतीय मच्छीमारांनी शिशांचे गोळे, दगडफेक करीत राज्यातील मच्छीमार बोटी आणि त्यावरील कर्मचार्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात मच्छीमार बोटींच्या केबिनच्या काचा तुटल्या. बोटी, साधन-सामग्री आणि जाळींचेही नुकसान झाल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे चेअरमन प्रदीप नाखवा यांनी दिली. (वार्ताहर)मासळीची लूट?राज्यातील सागरी क्षेत्रात परप्रांतीय मच्छीमारांनी धुमाकूळ घातला आहे. बेधुंदपणे करीत असलेल्या प्रचंड प्रमाणातील मासेमारीमुळे राज्यातील मच्छीमारांच्या वाट्याची मासळी अक्षरश: लुटून नेत आहेत. परप्रांतीय मच्छीमार मासळी लुटून नेण्याबरोबरच राज्यातील मच्छीमारांवर हल्लेही करीत आहेत. अशा घुसखोरी करणार्या परप्रांतीय मच्छीमारांचा शासन, गस्ती पथक, मत्स्य व्यवसाय विभाग, पोलिसांनी दखल घेऊन बंदोबस्त करण्याची मागणी करंजा मच्छीमार संस्थेचे चेअरमन प्रदीप नाखवा यांनी केली आहे.
परप्रांतीयांचा १५ मच्छीमार बोटींवर हल्ला
By admin | Updated: May 17, 2014 22:04 IST