गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट आहे. त्यावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे ठरत आहे. महिलांनी आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण चांगले ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा ॲनिमियासारखा आजार होऊन अन्य आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आहारात लोहाची कमतरता झाली की ॲनिमिया होतो. ॲनिमियामध्ये रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे शरीरातील अवयवांवर परिणाम होतो.
सर्वसाधारणपणे पुरुषांत १३-१६ ग्रॅम टक्के, महिलांमध्ये १२ ते १५ ग्रॅम टक्के, गरोदर मातांमध्ये ११ ग्रॅम टक्के रक्त असावे लागते. ॲनिमिया हा किशोरवयीन मुलींत जवळपास ७० टक्के, मुलांत ५४ टक्के, तर ४९ वर्षांतील महिलांमध्ये ५० टक्के आहे. पुरुषांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण १५ टक्के असून त्याच्या तिप्पट महिलांमध्ये आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने ॲनिमियाला सायलेंट इमर्जन्सी असे म्हटले आहे. लोहाची कमतरता, बी १२, फोलिक ॲसिडमुळे हा आजार होतो.
महिलांमध्ये हा आजार अति रक्तस्राव, बालकांत जंतांचे आजार, लाल पेशींचे काही अनुवंशिक आजार, प्रसूतीपश्चात रक्तस्राव, काही दीर्घकालीन आजार, मुलींचा विवाह लवकर होऊन त्या गरोदर राहणे, दोन मुलांमधील अंतर कमी असणे, अशा बाबी या आजारास कारणीभूत ठरतात.
या आजाराची मासिक पाळीवेळी थकवा जाणवणे, रक्ताच्या कमतरतेमुळे धडधड होणे, गळून गेल्यासारखे वाटणे, भूक न लागणे, चिडचिडेपणा, नखे ठिसूळ होणे, केस पांढरे होणे, जास्त वेळ एकाग्रतेत काम न करता येणे, पायाला अथवा सर्वांगाला सूज येणे अशी लक्षणे आहेत.
वेळेत निदान न केल्यास महिलेची कार्यक्षमता अगदी कमी होते, रोग प्रतिकारशक्ती कमी होते, हृदय व फुप्फुसावर अतिरिक्त ताण पडून ते निकामी होण्याचा धोका असतो. गर्भवती महिलांमध्ये बाळाची वाढ पूर्ण न होणे, परिणामी कमी वजनाचे बाळ जन्मणे, बाळंतपणात गुंतागुंत असे या आजाराचे परिणाम होतात.
लोहयुक्त आणि संतुलित आहारामुळे हा आजार टाळता येऊ शकतो. चणे, पालक, ब्रोकोली, भोपळा बिया, सूर्यफूल बिया, काजू, पिस्ता, गूळ, बदाम खाण्यामुळे ॲनिमिया टाळता येऊ शकतो. तसेच भाज्या लोखंडाच्या भांड्यात शिजवाव्यात, महिलांनी वर्षातून एकदा तरी हिमोग्लोबीन तपासणी करावी, असा सल्लाही विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील सहयोगी प्रा. डॉ. विमल होळंबे-डोळे यांनी दिला.