दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात; मात्र त्यातील तरतुदी, योजनांची ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिक, युवकांना माहितीही नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अर्थसंकल्प हा कितपत उपयुक्त असतो, याची किंचितही कल्पना नसल्याचे पहावयास मिळाले. सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळात आणखीन महागाईचा भडका वाढू नये, अशी सापेक्ष भावना सर्वसामान्यांतून व्यक्त झाली. दरम्यान, काहींनी अर्थसंकल्प बरा असल्याचे सांगितले तर काहींनी अर्थसंकल्पात कुठलीही आशा नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अर्थसंकल्प सादर झाला; पण त्यातून आम्हाला काय मिळणार? दूरचित्रवाणीवर अर्थसंकल्पातील घोषणा ऐकल्या; परंतु त्या प्रत्यक्षात कितपत उतरतात, हा खरा प्रश्न आहे.
- मेघा नराळे, सर्वसामान्य गृहिणी.
यंदाच्या अर्थसंकल्पात आयात तेलाच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आणखीन तेलाचे दर वाढतील. सरकार जीएसटी, इन्कमटॅक्समध्ये सवलत देईल, अशी अपेक्षा होती.
- जगन्नाथ बिरनाळे, किराणा दुकानदार.
अर्थसंकल्प सादर झाल्याचे ऐकले; पण ते आम्हाला समजायला तर हवं. आम्ही फक्त खासगी नोकरी जाणतो. अर्थसंकल्पाचा फायदा, तोटा लवकरच समजेल.
- सादिक शेख, खासगी नोकरदार.
देशात पायाभूत सुविधा, कृषी, शिक्षण, आरोग्य, रस्ते, रोजगार वाढीसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. जीएसटी नियमात, दरात बदल करण्यात आले नाहीत. रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न करणारा हा अर्थसंकल्प आहे.
- दिनेश गिल्डा, व्यापारी.
यंदाच्या अर्थसंकल्पात रस्ते, वाहतुकीसाठी चांगली तरतूद करण्यात आली आहे. आम्हाला केवळ चांगले रस्ते, सुरक्षित वाहतूक आणि महागाई नको, एवढीच अपेक्षा असते.
- श्रीकृष्ण पाडे, ॲाटोचालक.
आपला देश कृषीप्रधान असल्याने शेती सुधारण्यासाठी चांगले कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. त्यामुळे शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असणे आवश्यक आहे.
- देवराव म्हेत्रे, शेतकरी.
सरकारकडून कुठलाही कर सुरुवातीस तो पेट्रोल, डिझेलवर आकारला जातो. त्याची झळ ग्राहकांना बसते. त्यामुळे महागाई वाढण्यास सुरुवात होते. हा कर कमी होणे आवश्यक आहे.
- अजय शहा, पेट्रोल पंपचालक.
यंदाचा अर्थसंकल्प हा आशादायी नाही. त्यात ज्येष्ठांच्या हिताचा कुठलाही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे महागाई आणखीन वाढून जगणं असह्य होणार आहे.
- डॉ.बी.आर. पाटील, ज्येष्ठ नागरिक.
अर्थसंकल्प सादर झाला; पण त्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही तशीच स्थिती आहे.
- विष्णू शेळके, युवक.
सरकारने दरवर्षीप्रमाणे अर्थसंकल्प सादर केला असेल; पण आमच्यासारख्या गोरगरीब हातावर पोट असलेल्यांसाठी काय असणार आहे? आम्हाला त्यातील काहीही समजत नाही.
- सुधाकर शेंडगे, भाजीपाला विक्रेता.
बसस्थानक...
येथील मध्यवर्ती बसस्थानकात अवघ्या २ टक्के नागरिकांचे अर्थसंकल्पाकडे लक्ष होते. बहुतांश नागरिकांना त्याची कुठलीही माहिती नसल्याचे पहावयास मिळाले. एक-दोन प्रवाशांना अर्थसंकल्पासंदर्भात चर्चा केली असता, त्यातील आम्हाला काय समजणार, त्यासाठी त्या क्षेत्रातील लोकांना बोलावे लागेल, असे सांगितले.
रेल्वेस्थानक...
लातुरातील रेल्वेस्थानकावर अवघ्या काही नागरिकांनाच अर्थसंकल्पाबाबत माहिती होती. अनेकांचा अर्थसंकल्पाशी कुठलाही संबंध नसल्याचे पहावयास मिळाले. अर्थसंकल्प काहीही असो. आगामी काळात महागाई वाढू नये, अशी अपेक्षा काही प्रवाशांनी बोलताना व्यक्त केली.