घरी राहून कंटाळा आल्याने जाणार शाळेत...
कोरोनाच्या महामारीमुळे मार्च महिन्यापासून शाळा बंदच आहेत. त्यात ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू असला तरी प्रत्यक्ष शाळेतील अनुभव वेगळाच असतो. ऑनलाईनमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षकांना लक्ष देता येत नाही. तर विद्यार्थ्यांनाही त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्याची गैरसोय होते. प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार असल्याने आपल्या मित्रांना तब्बल १० महिन्यानंतर भेटणार असल्याने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे. घरी राहून अनेकांना कंटाळा आला आहे. त्यातच परीक्षा तोंडावर आलेल्या असल्याने विद्यार्थी अभ्यासाकडे अधिक लक्ष देतील. दरम्यान, शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पहावयास मिळत आहे.
प्रतिक्रिया....
गेल्या दहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिकवणीमध्ये नेटवर्कींगचा अडथळा येत असल्याने गैरसोय होते. आता शाळा सुरु होणार असल्याने उपस्थित राहणार आहेत. ज्या विषयात अडचणी आहेत त्या पाठांची शिक्षकांकडून सोडवणूक करुन घेणार आहे. सोबत मास्क, सॅनिटायझर ठेऊन नियमांचे पालन करील. - पाचवीचा विद्यार्थी
शाळेत जाण्याची उत्सुकता आहे. कुटुंबीयांनीही परवानगी दिली आहे. शाळेचा गणवेश, बॅग, पुस्तके सर्व तयारी करुन ठेवली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत नियमित उपस्थित राहणार आहे. कोरोनामुळे अभ्यासात खंड पडला आहेत. पण तरीही परीक्षेच्या अनुषंगाने सर्व अभ्यास पूर्ण करणार आहे. मित्रांची भेट खूप दिवसांपासून झालेली नाही. त्यामुळे आतुरता आहे. -सहावीचा विद्यार्थी
कोरोनामुळे ७ एप्रिलपासून ऑनलाईन वर्ग सुरू झाले. आमच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. त्यामुळे आम्ही कोविड कॅप्टन उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी जाऊन अभ्यास करीत होतो. शाळा आता सुरू होत आहेत. आता आम्हाला प्रत्यक्ष वर्गात शिकविले जाणार असल्याने अभ्यासातील अडचणी दूर करण्यास मदत होणार आहे. - सातवीचा विद्यार्थी
गेल्या दहा महिन्यांपासून घरीच अभ्यास करीत आहे. सकाळी ऑनलाईन क्लास होत असल्याने अभ्यासाला गती मिळत होती. मात्र, गणित, इंग्रजी या विषयांच्या अडचणी सांगता येत नव्हत्या. आता बुधवारपासून नियमित वर्ग सुरु होणार असल्याने मित्रांसोबत अभ्यास करता येईल याची उत्सुकता आहे. मास्क, सॅनिटायझर, फिजीकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करणार आहे. - आठवीचा विद्यार्थी
शिक्षण विभागाची तयारी...
शाळा सुरू करण्याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शाळांना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. शिक्षकांच्या कोरोना चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. तसेच शाळांचे निर्जंतुकीकरण, थर्मल स्क्रीनिंगबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शासन निर्देशानुसार एका बेंचवर एकच विद्यार्थी बसणार असल्याचे प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांनी सांगितले.