वलांडी येथून दुचाकीची चोरी
लातूर : वलांडी येथे दवाखान्यासमोर पार्किंग केलेल्या एमएच २४. बीए ५७३६ क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत सुभाष शेषेराव बिरादार यांच्या तक्रारीवरून देवणी पोलिसांत गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोफौ डफाडवाड करीत आहेत. दरम्यान, लातूर शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
जमीन नावावर करून देण्यासाठी मारहाण
लातूर : तुम्ही ७ आर जमीन आमच्या नावावर का करून देत नाही, म्हणून शिवीगाळ करून भांडणाची कुरापत काढून फिर्यादी व फिर्यादीच्या चुलत्यास मारहाण करण्यात आली, तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना धनेगाव शिवारात घडली. याबाबत सुदर्शन सीताराम खारे यांच्या तक्रारीवरून देवणी पोलिसांत नवनाथ दादाराव खारे व अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉर्न का वाजविलास म्हणून मारहाण
लातूर : हॉर्न का वाजवलास म्हणून संगणमत करून फिर्यादी व फिर्यादीच्या वडिलांना इस्लामपुरा रोडवर मारहाण करण्यात आली. बेल्ट, लोखंडी सळईने तसेच दगडाने डोक्यात मारुन जखमी केले. असे साजीद मकासाब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरबाज इलियाज शेख व अन्य तिघांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण
लातूर : शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे अंत्यविधीवरून येत असताना मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत अंतराम किसन साळुंके यांनी शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भानुदास दत्तु पवार व अन्य दोघांविरुद्ध शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉं तपघाले करीत आहेत.
दुकानाचे शटर उचकावून चोरी
लातूर : सोना नगर येथे दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून एलईडी लंपास केली. याबाबत वैजनाथ ज्ञानोबा कोंबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.