लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी आणि दुसऱ्या टप्प्यात ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरू झाले असले तरी वरिष्ठ महाविद्यालये अद्यापि बंद आहेत. या विद्यार्थ्यांनाही आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन वर्ग सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. ऑनलाईनने लर्निंग व्यवस्थित होत नसल्याचे म्हणणे वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेही आहे.
जिल्ह्यात ११७ वरिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये ४७ हजार ८०० विद्यार्थीसंख्या आहे. नागरी महाविद्यालये वगळता ग्रामीण भागातील महाविद्यालयांचे ऑनलाईन वर्गही होत नाहीत. विद्यापीठाचा अभ्यासक्रम प्राप्त करून विद्यार्थी स्वयंअध्ययन करून परीक्षा देत आहेत. कोरोनामुळे शैक्षणिक नुकसान झाल्याची भावना विद्यार्थ्यांच्या मनात आहे. पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्याने या विद्यार्थ्यांनाही आता काॅलेजेस सुरू होण्याची ओढ लागली आहे. विद्यार्थी ऑनलाईनला कंटाळले असून, ऑफलाईनची त्यांना प्रतीक्षा आहे.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे वर्ग सुरू झाले आहेत. शासनाने आता वरिष्ठ महाविद्यालयही सुरू करणे गरजेचे आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल. सदर मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राज्यभर आंदोलन करत आहे. त्यानुसार लातूर, उदगीर, औसा, अहमदपूर आदी ठिकाणी अभाविपने आंदोलन केले आहे.
- मीत ठक्कर, अध्यक्ष अभाविप
शहरी भागातील महाविद्यालयांनी ऑनलाईन वर्ग घेतले, परंतु ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालयांनी ऑनलाईन वर्ग घेतले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. शिक्षण मिळाले नाही. आतातरी शासनाने महाविद्यालय सुरू करून ऑफलाईन वर्ग सुरू करावेत. कोरोनाचा संसर्ग कमी झालेला आहे. त्यामुळे वर्ग सुरू करण्यास काहीच हरकत नाही, अशी मागणी आहे.
- प्रीतम दंदे, सम्यक विद्यार्थी आंदोलन
आमच्यापेक्षा लहान मुलांचे वर्ग सुरू झालेले आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी ज्या सूचना वा गाईडलाईन दिल्या जातील त्या फाॅलो करण्यासाठी आमच्यात समज आहे. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यास काही हरकत नाही. जेणेकरून पदवीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळेल. वर्ग नाही. प्रात्यक्षिक नाही. पुढे कसे कळेल? त्यामुळे ऑफलाईन सुरू करावे.
- प्रवीण करमले, विद्यार्थी