जिल्ह्यात ४१८ जणांवर उपचार सुरू
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, सध्या ४१८ जणांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने होम आयसोलेशनसाठी स्वतंत्र नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे १८० हून अधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनाने आतापर्यंत ६८३ जणांचा बळी घेतला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने चाचण्यांवर अधिक भर दिला जात आहे.
रेल्वे लाईन रस्त्यावर पथदिव्यांची मागणी
लातूर : जुन्या रेल्वे लाईनच्या रस्त्यावरील दुभाजकामध्ये पथदिव्यांची सोय नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. याच रस्त्यावरून पाच नंबर चौकाकडे जाण्यासाठी दिवसभर वर्दळ असते. मात्र सायंकाळच्या वेळी अंधार असल्याने रस्ता सामसूम असतो. शहर महापालिकेने तात्काळ रेल्वे लाईन रस्त्यावर पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
जिल्ह्याच्या कमाल तापमानात वाढ
लातूर : सध्या हिवाळा सुरू असला तरी थंडी गायब आहे. कमाल तापमान ३१ अंशांवर पोहोचले असून, किमान तापमान १७ अंश सेल्सिअसवर आहे. गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात थंडी नसल्याचे चित्र आहे. दुपारच्या वेळी उकाडा जाणवत असल्याने अनेकजण पंखा, कुलरचा आधार घेत आहेत.
शेत-शिवारात हरभरा पीक बहरले
लातूर : रबी हंगामात हरभऱ्याचा २ लाख ५० हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. यंदा मुबलक प्रमाणात पाणी असल्याने शेत-शिवारात हरभरा पीक बहरले आहे. तांदुळजा, सारसा, जेवळी, हरंगुळ, साई, नागझरी आदी भागांत हरभरा पीक जोमात आहे. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना हरभऱ्यावरील फवारणी संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे.