येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य शाखेसमोर ही निदर्शने करण्यात आली. यावेळी कॉ. धनंजय कुलकर्णी म्हणाले, सध्या बँकिंग उद्योगात अस्थिरता, असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जात आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे बचतदारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होईल.
बँकांच्या आजच्या दुरवस्थेला थकीत कर्जे जबाबदार आहेत. त्यावर उपाय म्हणून सुरुवातीला वसुली प्राधिकरणे आली, नंतर सरफेसी कायदा आला, त्यानंतर दिवाळखोरी कायदा आला; पण या थकीत कर्जदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या अर्थसंकल्पात सरकारने थकीत कर्ज एकत्रित करून एक रिकव्हरी कंपनी स्थापन करण्याची घोषणाही केली आहे. ज्यामुळे सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील थकीत कर्जे एका छत्रीखाली आणली जातील आणि त्या बँकांचे ताळेबंद स्वच्छ केले जातील. एकदा हे ताळेबंद स्वच्छ झाले की, या बँकांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव पुढे आणला जाईल. ही थकीत कर्जे एकदा दृष्टिआड झाली की, मग विविध मार्गांचा अवलंब करत तडजोड करून मोठ्या थकीत कर्जदारांना मोकळे केले जाईल, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी शहरातील तसेच लातूरनजीकच्या शाखांतून ७० ते ८० बँक कर्मचारी-अधिकारी उपस्थित होते.