जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत अंथरुणावर खिळून असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करण्यात आली. या माहितीच्या आधारे आरोग्य विभागाचे पथक संबंधित व्यक्तींच्या घरी जाऊन नातेवाइकांचा भेटले. ज्या नातेवाइकांनी लस देण्याबाबत हमीपत्र दिले, त्या व्यक्तींना लस देण्यात आली आहे. २७ ऑगस्टपर्यंत अंथरुणावर असलेल्या ३३३ व्यक्तींना ग्रामीण भागांमध्ये लस देण्यात आली आहे. शहरामध्ये मात्र हा कार्यक्रम फसला आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने संकेतस्थळावर माहिती देण्यासंदर्भात नातेवाइकांना आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही, शिवाय मनपाच्या आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन माहिती संकलित केली नाही. त्यामुळे शहरात अंथरुणावर खिळून असलेले लसीकरण निरंक आहे. मनपाच्या नागरी आरोग्य केंद्र अंतर्गत कोविड काळात घरोघरी सर्व्हे करण्यात आला होता. सर्दी,ताप, खोकला असलेल्या रुग्णांची नोंद केल्या जात होती. त्यावेळी नोंद घेता आली असती; परंतु नोंद न घेतल्यामुळे मनपाकडे अंथरुणावर खिळून असलेल्या रुग्ण व्यक्तींची माहितीच नाही. या वर्गात लसीकरण निरंक आहे.
९३ गरोदर मातांनी घेतली लस
कोऱोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासंदर्भात सुरुवातीच्या काळात समज-गैरसमज होते. त्यामुळे लस घेण्यास होकार-नकार येत असायचा. गरोदर मातांना लस देण्यासंदर्भातील असेच समज, गैरसमज होते; मात्र आरोग्य विभागाने याबाबत ग्रामीण भागात समुपदेशन करून गरोदर मातांना आतापर्यंत लस दिली आहे.
जिल्ह्यात ४२ टक्के लसीकरण.....
जिल्ह्यात २२ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २ लाख ८ हजार ९१५ इतकी आहे. तर फक्त पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ६ लाख ४० हजार ४६८ इतकी आहे. आतापर्यंत फक्त ४२ टक्के लसीकरण झाले आहे. पूर्ण लसीकरण होण्यासाठी आणखीन पाच-सहा महिने लागण्याची शक्यता आहे.