विनायक चाकुरे,
उदगीर : उदगीर बाजार समितीत नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, जवळपास ४०० क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली. ६ हजार ते ६ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळत आहे. दरम्यान, मुगात ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्याने दर कमी मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या येथील बाजारात नांदेड जिल्ह्याच्या काही भागातून तसेच कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातून मुगाची आवक होत आहे.
यंदा केंद्र शासनाने मुगाची आधारभूत किंमत ७ हजार २७५ रुपये प्रती क्विंटल जाहीर केली आहे. यंदाच्या जूनमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी मुगाची पेरणी केली होती. तालुक्यात १ हजार ५४३ हेक्टरवर पेरा झाला होता. तालुक्यातील एकुण खरिपाच्या ६४ हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत मुगाचा पेरा अल्प आहे. त्यातच जुलैमध्ये पावसाने उघडीप दिल्याने मुगाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बाजारात आवक मर्यादित प्रमाणात होत आहे. सध्या जी आवक आहे, ती शेजारील नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यातील व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातील आहे. मुगात ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने दर कमी मिळत आहे.
गुरुवारी येथील बाजार समितीत ४०० क्विंटलपेक्षा जास्त मुगाची आवक झाली. यावर्षी सर्वच पिकांची स्थिती चांगली असून, उत्पादनही कमी होत असल्याने दरही स्थिर राहणार नाहीत, असे व्यापारी सांगत आहेत. साधारणत: मुगात १३ टक्के ओलावा असावा, असे व्यापारी सांगतात. परंतु, सध्या २० ते २५ टक्क्यांपर्यंत ओलावा असल्याने शेतकऱ्यांना दर कमी मिळत आहे. शासनाने जरी ७ हजार २७५ रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला असला तरी अद्याप हमीभावाच्या दराने खरेदी करण्यासाठी शासनाचे खरेदी केंद्र सुरू होण्याच्या कुठल्याही हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र केव्हा सुरू होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सोयाबीन उत्पादनाकडे लागल्या नजरा...
बाजारात जरी नवीन मुगाची आवक सुरू झाली असली तरी या भागातील प्रमुख पीक सोयाबीन असल्याने व्यापाऱ्यांच्या नजरा या सोयाबीनच्या राशीकडे लागल्या आहेत. यंदा काही शेतकऱ्यांचा सोयाबीन विक्रमी दराने विक्री झाल्याने सर्व शेतकऱ्यांच्या आशा सोयाबीनच्या उत्पादनाकडे लागल्या आहेत. मागील आठवड्यापासून तालुक्यातील सर्व मंडळात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत असल्याने सोयाबीनचे उत्पादन चांगले होण्याची आशा आहे.
ओलाव्यामुळे दर कमी...
यावर्षी सध्या तरी पाऊस नसल्याने मुगाचा दर्जा चांगला आहे. परंतु, शेतीमालात ओलावा जास्त असल्याने दर कमी मिळत आहेत. पावसाने अशीच उघडीप दिल्यास मुगाच्या राशी लवकर होतील. परंतु, शेतकऱ्यांनी आपला शेतमाल वाळवून विक्रीसाठी आणल्यास बाजारात चांगला दर मिळू शकतो.
- लक्ष्मीकांत चिकटवार, व्यापारी.