अहमदपूर : राज्य शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेतील सर्वच लाभधारकांनी आपले आधार नोंदणी करणे गरजेचे आहे. आधार नोंदणी न केल्यास फेब्रुवारीमध्ये रेशन दुकानातून धान्य मिळणार नाही.
तालुक्यातील १६५ स्वस्त धान्य दुकानदारांचे पॉस मशीन व संलग्नीकरणाविषयी प्रशिक्षण पार पडले. अन्नसुरक्षा योजनेत शासनाने पोर्टेबिलिटी योजना चालू केली आहे. त्यामुळे कोणताही लाभार्थी कुठेही आपले धान्य उचलू शकतो. मात्र हे करण्यासाठी त्यांचे आधार संलग्नीकरण गरजेचे आहे. एकाच कुटुंबात १० व्यक्ती असतील तर त्या सर्व व्यक्तींचे आधार संलग्नीकरण व एक मोबाईल क्रमांक संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांना देणे गरजेचे आहे. याविषयी शासनाने वेळोवेळी मुदतवाढ दिली असतानासुद्धा तालुक्यात २३ हजार ८४० लाभधारकांचा आधार क्रमांक संलग्नीकरण नसल्यामुळे त्यांना फेब्रुवारीमध्ये स्वस्त धान्य मिळणार नाही. ते शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेच्या लाभापासून वंचित होणार आहेत.
तालुक्यात अंत्योदय योजनेत २२ हजार ८५ सदस्य आहेत. त्यात आधार नोंदणी असलेल्यांची संख्या १९ हजार, ३९० तर आधार नोंदणी नसलेल्यांची संख्या दोन हजार ६९५ आहे. प्राधान्य कुटुंबांमध्ये १९ हजार ४३ कार्डधारक असून सदस्यसंख्या एक लाख ५६ हजार ५३३ आहे. आधार नोंदणी असलेले एक लाख ४० हजार २०९ सदस्य आहेत. आधार नोंदणी नसलेले १६ हजार ३२५ सदस्य आहेत. शेतकरी कुटुंब योजनेत सहा हजार ८२३ कार्डधारक असून, सदस्यसंख्या ३६ हजार १६४ आहे. त्यांपैकी ३१ हजार ३५५ सदस्यांचे आधार संलग्नीकरण झाले असून, चार हजार ८०९ सदस्यांचे अद्यापही नाही. एकूण २३ हजार ८४० सदस्यांनी आपले आधार संलग्नीकरण केलेले नाही. त्यामुळे ते शासनाच्या योजनेस पात्र राहणार नाहीत. म्हणून नागरिकांनी त्वरित आधार संलग्नीकरण करून घ्यावे, असे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
संलग्नीकरण गरजेचे
लाभधारक कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी संलग्नीकरण करणे गरजेचे असून त्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांच्या पॉस मशीनवर संलग्नीकरण करून कुटुंबप्रमुखाचा मोबाईल क्रमांक रजिस्टर करावा लागणार आहे. त्यामुळे लाभधारकांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानदारांकडे जाऊन संलग्नीकरण करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
शंभर टक्के संलग्नीकरण
सद्य:स्थितीत अहमदपूर तालुक्यात ८६ टक्के संलग्नीकरण झाले असून अद्यापही १४ टक्के लाभार्थी यापासून वंचित आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांनी स्वतः लाभधारकाकडे जाऊन अथवा दुकानावर बोलावून प्रत्येकाचे आधार संलग्नीकरण करणे गरजेचे असल्याचे साहाय्यक पुरवठा अधिकारी महेश सावंत यांनी सांगितले.