तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ४४९ उमेदवार नशीब अजमावीत होते. साकोळमध्ये राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष कल्याण बर्गे आणि जय जवान कारखान्याचे माजी संचालक राजकुमार पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. येरोळच्या निवडणुकीसाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, कानेगावात जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, बोळेगावात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर बंडगर यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली होती. काही दशकांपासून बिनविरोध असलेल्या धामणगाव येथील निवडणुकीसाठी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनराज पाटील, कारेवाडीत राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे साकोळ, येरोळ, कानेगाव, बोळेगाव, धामणगाव, कारेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुका लक्षवेधी ठरल्या.
साकोळ येथे महाविकास आघाडीचे कल्याण बर्गे, राजकुमार पाटील, येरोळमध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, कानेगाव येथे जिल्हा परिषदेचे सभापती गोविंद चिलकुरे, धामणगावात धनराज पाटील, कारेवाडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, हिप्पळगावात राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष डी.एन. शेळके, हालकीत भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश कोरे यांनी ग्रामपंचायतीचा आपला गड राखला आहे. बोळेगाव येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर बंडगर यांना धक्का बसला. काही गावांत तरुणांना पसंती मिळाली आहे.
वर्चस्वासाठी दावे- प्रतिदावे
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींपैकी ४ राष्ट्रवादी, ८ महाविकास आघाडी, १० भाजप, १ स्वाभिमानी, तर ४ स्थानिक आघाडीच्या ग्रामपंचायती आल्या असल्या तरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्याच पक्षाला जास्त ग्रामपंचायती मिळाल्याचे भाजपाचे मंगेश पाटील, धनराज पाटील, गोविंद चिलकुरे, तसेच राष्ट्रवादीचे डॉ. बापूसाहेब पाटील, युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दावे- प्रतिदावे केले आहेत.