पावसाळा सुरू होण्यासाठी केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामपूर्व कामे आटोपत आहेत. काही शेतकरी बी- बियाणे, खतांची चौकशी करून जुळवाजुळव करीत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांना अधिक दराने रासायनिक खतांची विक्री केली जाऊ नये. एमआरपीनुसार खतांची विक्री व्हावी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे. त्यानुसार रासायनिक खत विक्रेत्यांना एमआरपीप्रमाणे खत विक्री बंधनकारक केले आहे. तसेच शेतकऱ्यांनीही खते खरेदी करताना एमआरपीनुसार ती खरेदी करावीत. ई- पॉस मशीनद्वारे आधार कार्डचा वापर करावा. खरेदीवेळी दुकानदारांकडून पक्की पावती घ्यावी. खताच्या पोत्यावरील निर्देशित एमआरपीपेक्षा जर ज्यादा दराने व कच्च्या पावतीवर विक्रेत्याकडून खताची विक्री होणे, खत उपलब्ध असतानाही ते विक्री न करणे असे आढळून आल्यास शेतकऱ्यांनी याबाबत तालुका स्तरावरील तालुका कृषी अधिकारी अथवा पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवावी. तसेच जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांच्याकडील तक्रार निवारण कक्षाकडेही तक्रार करता येईल.
८६ हजार ८८० मे. टन आवंटन...
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात विविध प्रकारच्या खताचे ९६ हजार ८८० मे. टन आवंटन प्राप्त झाले आहे. मासिक आवंटनाप्रमाणे खताची उपलब्धता होत आहे. मागील वर्षीचा ५४ हजार ९५१ मे. टन खत साठा उपलब्ध आहे. सध्या जिल्ह्यात खताची पुरेशी उपलब्धता आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने व कृषी विकास अधिकारी सुभाष चोले यांनी सांगितले.
खत, बियाणे, कीटकनाशके खरेदीबाबत तक्रार असल्यास जिल्हा स्तरावरील ०२३८२ २४३९४९, ०२३८२ २५९५९५ क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.