शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामातील मुगाच्या राशींना सुरुवात झाली आहे. मात्र, उतारा ५० टक्क्यांनी घटल्याने शेतकरी हतबल होत आहेत. मध्यंतरीच्या कालावधीत पावसाने ताण दिल्याने त्याचा फळधारणेवर परिणाम होऊन माळरानावरील मुगाच्या उत्पन्नात घट झाली असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे लागवडीचा खर्चही पदरी पडेल की नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. प्रत्येक वर्षी सोयाबीनचा पेरा वाढत आहे. यंदा तर एकूण लागवडीच्या क्षेत्राच्या २८ हजार ५०० हेक्टरपैकी २३ हजार ७०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. मूग, उडीद ही डाळवर्गीय पिके असल्यामुळे तालुक्यातील काही गावांतील शेतकऱ्यांनी मूग, उडदाची पेरणी केली होती. यंदा मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने वेळेवर पेरण्या झाल्या. सुरुवातीच्या काळात सोयाबीनसह मूग, उडीद चांगले बहरले होते; परंतु ऐन फूल, फळ लागवडीच्या कालावधीत पावसाने २० ते २५ दिवस मोठा ताण दिला. त्यामुळे माळरानावरील मूग, उडदाचे पीक करपले. परिणामी, माळरानावरील मुगाचा उतारा पन्नास टक्क्यांनी घटला असल्याने लागवडीचा खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात ३२३ हेक्टरवर मुगाचा पेरा...
शिरूर अनंतपाळ तालुक्यात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. यंदा मुगाचा पेरा मोठ्या प्रमाणात घटला असून, केवळ ३२३ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली होती. उडदाचे क्षेत्र त्यापेक्षा कमी झाले आहे. केवळ १५६ हेक्टरवर उडदाची पेरणी झाली होती. त्यामुळे पेरा कमी आणि उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
पीक कापणी प्रयोग सुरू...
तालुक्यात सध्या खरीप हंगामातील मूग, उडदाच्या राशी सुरू असल्याने तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने विविध गावांत पीक कापणी प्रयोग सुरू करण्यात आले आहेत; परंतु पीक कापणी प्रयोगात कसदार जमिनीतील मुगाचाही अपेक्षित उतार येत नाही. माळरानावरील मुगाचा उतारा तर पन्नास टक्क्यांनी घटला असल्याचे संजीव गुणाले, कल्याणराव बिरादार, योगेश बिरादार, सीताराम पाटील, बालाजी बिरादार, शिवाजीराव बिरादार यांनी सांगितले.