यंदा वेळेवर मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परिणामी, तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतीची मशागत करीत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी मार्चमध्ये शेतीत नांगरणी केली होती. त्यानंतर, महिनाभर थांबून पाळी मारण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी शेतात किमान दोनपेक्षा जास्त पाळ्या मारून शेती अधिक सुपीक कशी होईल, याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
हवामान खात्याने यंदा पुरेसा पाऊस होईल, असा अंदाज वर्तविल्याने शेतकरी पेरणीपूर्व कामे आटोपत आहेत. त्याचबरोबर, काही शेतकऱ्यांनी पेरणीचे यंत्र दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे. शेतात पेरणीसाठी लागणाऱ्या योग्य बियाणांची चौकशी करीत आहेत. दरम्यान, कृषी विभागाकडून सोयाबीन बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा होतो. त्या पाठोपाठ तूर पिकाचे उत्पादन शेतकरी घेतात. बी-बियाणे, खतांची शेतकरी चौकशी करीत आहेत.
मागील दोन-तीन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा चांगला पाऊस होईल, अशी आशा लागली आहे. सध्या हंगामपूर्व शेतीची कामे आटोपण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.
यंत्राद्वारे मशागतीच्या दरात वाढ...
यंदा इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरवर मशागत करण्याच्या दरातही वाढ झाली आहे. नांगरणी, रोटा मारणे, माेगडणे, सरी सोडण्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बैलाद्वारे शेतकरी करणे शक्य नसल्याने नाईलाजास्तव यंत्राचा वापर करावा लागत आहे, असेही शेतकरी म्हणाले.
मशागतीच्या दरात वाढ झाल्याने शेतीसाठी केलेला खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे आर्थिक संकट निर्माण होत असल्याचेही तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सांगितले.