महिलांनी दरवर्षी स्वत:ची वैद्यकीय तपासणी करून घेतली पाहिजे. तर गर्भ पिशवीचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर यासारख्या गंभीर आजारांचे लवकर निदान होवू शकते. ज्यामुळे त्याला वेळीच आळा बसू शकतो. अर्थातच आयुष्याच्या प्राधान्यक्रमात आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबन ही त्रिसूत्री असली पाहिजे, असे ठाम प्रतिपादन करणाऱ्या डॉ. ज्योती राहुल सूळ यांचा वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सहभाग उल्लेखनीय आहे.
डॉ. ज्योती सूळ यांचे शिक्षण औरंगाबादच्या बळीराम पाटील विद्यालय आणि वसंतराव नाईक महाविद्यालयात झाले. तर मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेज व नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. डॉ. ज्योती यांचे वडील एकनाथराव पांढरे, आई आणि पती डॉ. राहुल सूळ हे त्यांचे आदर्श आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करीत असताना डॉ. ज्योती यांनी स्त्रियांच्या शारीरिकच नव्हे, तर मानसिक समस्यांचा जवळून अभ्यास केला आहे. त्यांच्या व्यक्तिगत प्रश्नांचीही उकल करण्याचा प्रयत्न त्या करतात. त्यातूनच डॉ. ज्योती यांना सोशिओ मेडिकल को-ऑर्डिनेटर म्हणून काम करता आले. बनसुडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालक तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ, एमआयएमएसआर मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय व्यवसायात मिळालेले यश उत्साह वाढविणारे तर काही प्रसंगांतील अपयश अनुभव देणारे असते. त्या दोन्हीही गोष्टी अनुभवल्या पाहिजेत. अर्थात तटस्थ राहू नये, असे डॉ. ज्योती सूळ यांना वाटते. आयएमएच्या वूमन्स विंगमध्ये त्या सक्रियपणे काम करतात. लातूर कपडा बँकेच्या त्या सचिव आहेत. याबरोबरच लातूर वृक्ष, सेन्ट्रल गव्हर्न्मेंट कम्युनिटी हेल्थ सर्व्हिसेस को-ऑर्डिनेटर म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. डॉ. ज्योती सूळ यांना मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र बेस्ट सोशल वर्कर्स- २०२०, आयएमए स्टार अवॉर्ड- २०१८ व २०१९ तसेच लातूर कपडा बँक कार्यगौरव पुरस्कार, रयत प्रतिष्ठानचा सामाजिक कार्यगौरव पुरस्कार मिळाला आहे. तसेच जिजाऊ पुरस्कार, पुण्याचा मल्हार मेडिकोज पुरस्कार, सेवा अकादमीच्या राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने त्यांचा बहुमान झाला आहे.
महिला सक्षमीकरण हे केवळ आर्थिक बाजूने नव्हे, तर शारीरिक आणि मानसिकदृष्टाही सक्षम बनले पाहिजे, ही डॉ. ज्योती सूळ यांची भूमिका आहे. त्यांच्या प्रगतिशील विचारांना पती डॉ. राहुल सूळ आणि संपूर्ण परिवार पाठिंबा देतो. आई दिवसभर वैद्यकीय आणि सामाजिक उपक्रमांमध्ये व्यस्त असते, ही मुलींची कधीही तक्रार नाही. त्याअर्थाने मुलगी वर्तिका आणि ओजस्वी यांचेही पाठबळ आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात महिलांनी परफेक्ट राहण्यापेक्षा समाधानी राहिले पाहिजे. सर्वप्रथम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे. सर्वांचे बघत बघत स्वत:च्या आनंदाकडे लक्ष द्यावे. त्यासाठी एखादा छंद नक्की जोपासावा. मुलींसाठी शिक्षण मोलाचे आहे. सर्वप्रथम शिक्षण आणि त्यानंतर स्वावलंबन, स्वसंरक्षणाचे धडे गिरविणे काळाची गरज आहे, हाच संदेश डॉ. ज्योती सूळ यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.