बेरोजगारांना रोजगाराच्या संधी आयटीआयच्या माध्यमातून उपलब्ध होत असतात. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत दोन फेऱ्या झाल्या असून, जिल्ह्यात १८ आयटीआय संस्थांमध्ये २ हजार ६३२ विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्राॅनिक्स मेकॅनिक, फिटर, फाऊंडर मॅन, मशिनिस्ट, बिल्डींग काॅन्ट्रॅक्टर, पेंटर जनरल, सीट मेटल वर्कर, टूल ॲण्ड मेकर, टर्नर, वेल्डर आदी शाखांचा समावेश आहे.
इलेक्ट्रिशियन या शाखेच्या २४० जागा असून, आतापर्यंत दोन फेऱ्यांमध्ये १६४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. जिल्ह्यात लातूर येथे २, औसा १, निलंगा १, देवणी १, जळकोट १, शिरूर अनंतपाळ १, उदगीर १, चाकूर १, रेणापूर १, अहमदपूर तालुक्यात १ शासकीय आयटीआय आहे. तर लातूर, आलमला, औसा, लामजना, उदगीर, घरणी, बालाघाट आदी ठिकाणी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत. या संदर्भात स्थानिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच आयटीआय महाविद्यालयाकडे शासन आदेश प्राप्त झालेला नाही.
यंदा प्रथमच मोबाईल ॲपद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविल्या जात आहेत. शासनाने जिल्हास्तरावर ७० टक्के तर राज्यस्तरावर ३० टक्के प्रवेश अशा स्वरूपात बदल केला आहे. पूर्वी हे प्रमाण तालुकास्तरावर ७० टक्के आणि जिल्हाबाहेरील ३० टक्के प्रवेश असे होते. प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, आयटीआयचे प्राचार्य, दोन पालक प्रतिनिधी यांचा समावेश असणारी प्रवेश नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. आयटीआय प्रवेश प्रक्रियेला गती मिळत आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ३३ शाखांचा समावेश
जिल्ह्यात आयटीआयसाठी ३३ शाखा उपलब्ध आहेत. यामध्ये प्लंबर, फाऊंड्री मॅन, डिझेल मेकॅनिक, सर्व्हेअर, मोटर व्हेईकल मेकॅनिक, सिव्हील ड्राफ्टस्मॅन, ड्रेस मेकिंग, पंप ऑपरेटर, फुड प्रोडक्शन जनरल, वायरमन, काॅम्प्युटर ऑपरेटर यासह अन्य शाखांचा समावेश आहे. सर्वाधिक वेल्डरसाठी २६०, इलेक्ट्रिशियन २४० तर वायरमनसाठी १६० जागा उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांचा कल इलेक्ट्रिशियनकडे
आयटीआय प्रवेशात विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल इलेक्ट्रिशियन शाखेकडे आहे. या शाखेसाठी २४० जागा असून, दोन फेऱ्याअंती १६४ प्रवेश निश्चित झाले आहेत. महिलांसाठी स्वतंत्र आयटीआय असून, त्याची प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्याचे सांगण्यात आले.