रमेश पाटील - कसबा बावडा --कोल्हापूर जिल्ह्यातील सधन तालुका म्हणून ‘करवीर’ तालुक्याची ओळख आहे. तालुक्यातून भोगावती, कुंभी आणि पंचगंगा या नद्या नेहमीच तुडुंब वाहत असल्यामुळे तालुक्याचा परिसर नेहमीच हिरवागार. तालुक्यातील बहुतेक शेतकरी प्रामुख्याने उसाचे पीक घेत असल्यामुळे राहणीमानाचा स्थर काहीसा उंचावलेला. त्यामुळेच तालुक्याचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी फारसे कोणाचे प्रयत्न झालेले नाहीत. आता मात्र करवीर तालुक्याचा इतर तालुक्यांप्रमाणे औद्योगिक विकास व्हावा, उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, असे येथील तरुण वर्गाला वाटू लागले आहे.तालुक्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्याने अनेक पिढ्या पारंपरिक पद्धतीने शेती आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करीत आले आहेत. तालुक्यातून शहरात येऊन शिक्षण घेतलेली तरुणाई नोकरी मिळत नसल्याने पुन्हा शेती व्यवसायाकडेच वळत आहे; परंतु आता शेती मालाला आणि दुधाला मिळणारा दर आणि त्यासाठी येणारा उत्पादन खर्च यांचा कोठेही मेळ बसत नसल्यामुळे पुन्हा तो नोकरीच्या शोधात बाहेर पडत आहे.तालुक्यातील साखर कारखान्याच्या माध्यमातून तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार जरी मिळाला असला, तरी तुलनेत बेकार तरुणांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे त्यांना कागल, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा तालुका व परिसरात जसे सहकाराच्या आणि खासगी माध्यमातून उद्योगधंदे झाले आणि त्या परिसरातील तरुणांची काही प्रमाणात का होईना बेकारीतून सुटका झाली, तशी सुटका आपली व्हावी असे वाटते, असे उद्योगधंदे करवीरमध्ये न झाल्याची खंत त्यांना आहे. तालुक्यातील नदीकाठच्या भाग सोडला, तर येथे औद्योगिक वसाहती होण्यास, उद्योगधंदे उभारण्यास गावठाणातील मुबलक जागा, मुबलक पाणी, दळणवळणाची चांगली सोय आहे. मात्र, असे उद्योगधंदे तालुक्यात होण्यासाठी कोणाचे फारसे प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे तालुक्याचा औद्योगिक विकास शुन्य झाला, असे म्हणता येईल.तालुक्यात प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाची चांगली सोय आहे. काही साखर कारखाना परिसरात महाविद्यालयीन शिक्षणाची सोय आहे. मात्र, इंजिनिअरिंग, रोजगार मिळवून देण्यास मदत करणारी औद्योगिक तंत्रशिक्षण महाविद्यालयाची सोय नाही, असे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना थेट कोल्हापूर गाठावे लागले. तालुक्याच्या विकासासाठी या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.तालुक्यात २७ अंगणवाड्या मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी काही अंगणवाड्याचे बांधकाम सुरू झाले आहे. मात्र, काही ग्रामपंचायतींनी अंगणवाड्यांसाठी जागाच उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे अंगणवाड्यांचे बांधकाम रखडले आहे. काही ग्रामपंचायतीनी अंगणवाड्यांसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे; परंतु ती अत्यल्प, गैरसोयीची अशी आहे. अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध होत नाही याबद्दल खंत व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील गांधीनगर, वळिवडे, उचगाव, कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, शिये, निगवे, आदींसह २४ गावांच्या सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी दूषित होते, हे आता सिद्ध झाले. या तलाुक्याशिवाय अन्य इतर तालुक्यांतील गावांमुळेही पंचगंगा दूषित होण्यास हातभार लागत आहे. तालुक्यातील या २४ गावांत सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात येणार होते. त्याचा सर्व्हेही झाला आहे. मात्र, अद्याप अशा प्रकल्पाचे काम कुठे झालेले नाही. ते वेळेत होणे गरजेचे आहे.तालुक्यात ६०० कि.मी. लांबीचे अंतर्गत रस्ते आहेत; परंतु सततच्या पावसामुळे आणि सततच्या वाहणाऱ्या वर्दळीमुळे हे रस्ते खराब झाले आहेत. या खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या निधीची गरज आहे. तसेच काही ठिकाणी दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची रुंदी वाढविणे गरजेचे आहे. अनेक गावांतील पेयजल योजना रखडल्या आहेत. काही ठिकाणी पाणी मिळत नाही, तर काही गावांत सांडपाण्यामुळे दलदल होत आहे. पेयजल योजना पूर्ण करण्याचे अधिकार गावाला दिल्यामुळे अशा योजनांवर शासनाचे नियंत्रण राहत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणांची कामे रखडली असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.पंचायत समितीला इमारतच नाहीसुजलाम्-सुफलाम् म्हणून ओळख असलेल्या करवीर तालुक्याच्या पंचायत समितीला हक्काची आणि स्वत:च्या मालकीची इमारत नाही. सध्या ज्या जागेवर पंचायत समितीची इमारत आहे. ती एका पत्र्याच्या शेडमध्ये आहे. सध्या या इमारतीच्या जागेबाबत न्यायालयात दावा सुरू आहे. अन्य तालुक्याच्या पंचायत समितीच्या टोलेजंग इमारती असताना करवीर पंचायत मात्र पत्र्याच्या शेडमधून आपला कारभार चालविते. हे सधन तालुक्याला नक्कीच भूषणावह नाही, हे मात्र निश्चित...! महत्त्वाच्या समस्याकरवीर पंचायत समितीला टोलेजंग आरसीसी इमारत असणे गरजेचेपंचगंगा प्रदूषित करणाऱ्या २४ गावांत सांडपाणी प्रक्रिया करणारे केंद्र उभारणे गरजेचेगावागावांतील पाणंदी प्रत्येकवर्षी मुरूम टाकून दुरुस्त करणे गरजेचे आहेअंगणवाड्यांसाठी दानशूर व्यक्तींनी आपली जागा देण्यासाठी पुढे येण्याची गरजरोजगार हमी योजनेची थांबलेली कामे पुन्हा करणे आवश्यककरवीरच्या पश्चिम भागातील वाड्या-वस्त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सर्वांत प्रथम प्राधान्य आवश्यकतंत्रशिक्षण व अभियांत्रिकी संस्थांची आवश्यकतातालुक्यातील वाकलेले आणि मोडकळीस आलेले विद्युत खांब बदलण्याची गरजरस्ते दुरुस्तीसाठी शासनाने निधी पुरविण्याची गरजशाळा दुरुस्ती आणि शाळेभोवती कुंपण बांधण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यकगूळ साठविण्यासाठी ‘कोल्ड स्टोरेज’ची गरजवृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक
कधी होणार ‘करवीर’चा औद्योगिक विकास ?
By admin | Updated: November 12, 2014 23:57 IST