शोभना कांबळे :रत्नागिरी :सिंंधुदुर्गपाठोपाठ आता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाचीही ई - कार्यालय प्रणालीकडे वाटचाल सुरू झाली असून, त्यादृष्टीने महसूल विभागात प्राथमिक तयारीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्गपाठोपाठ रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज ‘पेपरलेस’ होणार आहे.रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून आपल्या शिस्तबद्ध, तत्पर आणि कर्तव्यदक्ष कामाची चुणूक दाखवून दिली आहे. कौशल्यपूर्ण शैलीने कमी वेळेत अनेक कामांचा निपटारा त्यांनी केला आहे. नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन त्यांनी दिलासा दिला आहे. प्रशासनातील सर्व विभागांमध्ये सुसूत्रता आणून कामांची गती वाढविण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक असावे, यासाठी त्यांची आग्रही भूमिका आहे. या उद्देशाने आता ई आॅफीस प्रणाली करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ई आॅफीस प्रणालीतील राज्यातील पहिला जिल्हा आहे. त्यानंतर आता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाची वाटचाल सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे रूपांतर ई आॅफीस प्रणालीत झाल्यास या कार्यालयातील सर्व विभागांमध्ये सुसूत्रता येऊन कामांना गती मिळणार आहे. यापुढे कार्यालयातील सर्व कामकाज ‘पेपरलेस’ करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर ई आॅफीस करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तत्कालिन जिल्हाधिकारी विकासचंद्र रस्तोगी यांच्या कारकीर्दीत ई प्रणालीसाठी प्राथमिक स्तरावर प्रयत्न झाले होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर संगणकाची आवश्यकता आहे. महसूल विभागातील सुमारे १३,५०० पर्यंत शासकीय अध्यादेशांचे स्कॅनिंग करण्यात आले होते. सध्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या कारकीर्दीत आता या प्रणालीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे आता काही महिन्यातच जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज ‘पेपरलेस’ होणार असून, शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर ‘ई आॅफीस’ होणारे येथील जिल्हाधिकारी कार्यालय दुसरे ठरणार आहे. लोकाभिमुख, पारदर्शक कारभारासाठी...आतापर्यंत १४,३५५ शासकीय अध्यादेशांचे स्कॅनिंग झाले आहे. सध्या शासनाचे नवीन अध्यादेश शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होत असल्याने त्यांचा थेट संचय केला जात आहे. सध्या आवश्यक असे ई - मेल मिळविण्याचे काम सुरू झाले आहे. संगणीकृत स्वाक्षरी प्रमाणपत्र (डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट) साठी या कार्यालयातून १२६ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती संकेतस्थळावर मिळाली आहे. सध्या चालू कागदपत्रांचे स्कॅनिंग सुरू असून, लॉन कनेक्टिव्हिटीसाठी कार्यवाही सुरू आहे. यासाठी सध्या ११५ संगणक कार्यरत असून, १०० यंत्राची आवश्यकता लागणार आहेत. यासाठी १९८ इतके मनुष्यबळ सध्या कार्यरत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची ई - आॅफीसच्या दृष्टीने पावले पडत आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाम आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ‘पेपरलेस’ करण्यात येणार आहे. त्यामुळे कामकाज अधिक गतिमान व सुटसुटीत होणार आहे. यासाठी सध्या प्राथमिक स्वरूपाची तयारी सुरू असून, अधिक संगणकही मागविण्यात येणार आहेत.- एस. आर. बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी
वाटचाल ई-आॅफीसकडे
By admin | Updated: December 9, 2014 23:22 IST