कोल्हापूर : येथील शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील पोलीस नाईक विजय जयपाल घाटगे (वय ३८) यांचे सोमवारी कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराने निधन झाले. कार्यालयात असताना त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्याने त्यांना लक्ष्मीपुरीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले; पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या ते कोल्हापुरात राजोपाध्येनगरात राहत होते. हातकणंगले तालुक्यातील नरंद्रे हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
पोलीस नाईक विजय घाटगे हे हुशार आणि तपासात दर्जेदार काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पोलीस दलात प्रसिद्ध होते. ते पोलीस दलात २००८ मध्ये नोकरीत रुजू झाले होते. राजारामपुरीपाठोपाठ शाहूपुरी पोलीस ठाणे व आता शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयात गुन्ह्यांची उकल करण्यासाठी त्यांची खास नियुक्ती केली होती. त्यांच्या निधनाची बातमी कळताच शहर परिसरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी खासगी रुग्णालयात गर्दी केली होती.
फोटो नं. ०१०२२०२१-कोल-विजय घाटगे (निधन)