कोल्हापूर : महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मुत्सद्दी राजकारणी, माजी मंत्री, माजी खासदार उदयसिंगराव नानासाहेब गायकवाड यांचे आज, मंगळवारी दुपारी वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने ते आजारी होते. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू होते; परंतु दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज दुपारी ३.२० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेसचा निष्ठावंत पाईक, नि:स्पृह, निष्कलंक नेतृत्व हरपले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर उद्या, बुधवारी सकाळी ९ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मानसिंगराव, सून व जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण सभापती शैलजादेवी आणि निर्मला, ऊर्मिला, डॉ. शर्मिला व यशोमती या मुली व रणवीर, युद्धवीर अशी नातवंडे असा मोठा परिवार आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे माजी आमदार हर्षवर्धन देशमुख हे त्यांचे जावई होत. मृत्यूसमयी मुलगा , मुली, जावई देशमुख रुग्णालयात उपस्थित होते. उदयसिंगराव गायकवाड यांची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली होती. त्यामुळे ११ नोव्हेंबरला त्यांना उपचारार्थ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डायलेसिस उपचारही करण्यात आले; परंतु उपचारांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. उलट, त्यांचा रक्तदाबही कमी झाला तसेच फुप्फुसाला जंतुसंसर्ग झाल्याने प्रकृती अधिकच खालावली. न्यूमोनियाही झाला. गेले काही दिवस ते कोमातच होते. त्यामुळे कृत्रिम श्वासोच्छ्वासाचा आधार देण्यात आला होता. निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या ताराबाई पार्क येथील निवासस्थानी समर्थकांची गर्दी उसळली. ‘शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला’ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे रूजविणे, पक्षाची बांधणी मजबूतपणे करणे या कामांत गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याची त्यांना पक्षनेतृत्वाकडून पोहोचपावतीही मिळाली. स्थानिक पातळीवरील लोकल बोर्डाची निवडणूक ते राज्य विधिमंडळ आणि पुढे लोकसभेपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास अखंडित राहिला. पक्षनेतृत्वाचा वरदहस्त लाभलेल्या गायकवाड यांनी महाराष्ट्रातील तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात उद्योग, ऊर्जा, सामान्य प्रशासन, आरोग्य, नागरी पुरवठा, ग्रामीण व शहर विकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून यशस्विपणे धुरा सांभाळली होती. या काळात गायकवाड यांनी सहकारातील अनेक संस्थांना शासकीय मदत मिळवून देण्याबरोबरच नवीन संस्था उभारण्यात पुढाकार घेतला. शाहूवाडी तालुक्यात सोनवडे येथे गायकवाड यांच्या नावाने सहकारी साखर कारखान्याचीही उभारणी त्यांच्या काळात झाली आहे. (प्रतिनिधी) काँग्रेसशी एकनिष्ठसंसदीय कामाचा अनुभव, जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचा दबदबा लक्षात घेऊन पक्षनेतृत्वाने गायकवाड यांना देशाच्या राजकारणात घेत प्रमोशन दिले. १९८० मध्ये त्यांनी लोकसभेची पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर सलग पाचवेळा १९९८ पर्यंत मोठ्या मताधिक्याने निवडून येत आपली राजकीय ताकद सिद्ध केली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, राजीव गांधी यांच्याशी त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. गायकवाड यांना ‘दिल्लीच्या राजकारणात कोल्हापूरचा राजा’ असाच मान मिळत राहिला. ‘गायकवाड’ म्हणून स्वतंत्र गटजिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या नावाचा एक स्वतंत्र गटही अस्तित्वात होता. अनेक संस्थांवर या गटाची मजबूत पकड होती. गेल्या दहा-बारा वर्षांपासून उदयसिंगराव गायकवाड हे सक्रिय राजकारणापासून अलिप्त होते. उत्कृष्ट लेखक असलेल्या गायकवाड यांची ‘कथा बारा अक्षरांची’ ही आत्मकथा, तर ‘ट्रॉफीज’ हे शिकारकथांवर आधारित अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रूबाबदार व्यक्तिमत्त्व...गायकवाड यांचे व्यक्तिमत्त्व खानदानी व रूबाबदार होते. ‘पिळदार मिशा’ ही त्यांची खास ओळख होती. अत्यंत मृदू भाषेत ते बोलत. ते कधीच कुणाशी मोठ्याने बोलल्याचे ऐकिवात नाही. जाहीर सभा-समारंभातही ते तसेच बोलत. बोलण्यापेक्षा कृतीवर त्यांचा भर राहिला. लोकसभेच्या १९८९ च्या निवडणुकीत शेका पक्षाच्या गोविंदराव कलिकते यांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते, परंतु जनतेने त्यांच्याच गळ््यात विजयाची माळ घातली. गाळप प्रारंभास येण्याची इच्छा!सन २०१४-१५ च्या उदयसिंगराव गायकवाड साखर कारखान्याच्या शुभारंभास येण्याची इच्छा दवाखान्यात त्यांनी नातू रणवीर याच्याकडे प्रकट केली होती; परंतु त्यांची ती इच्छा अपुरीच राहिली. आज शाहूवाडी तालुका बंदबांबवडे : माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त समजताच शाहूवाडी तालुक्यावर शोककळा पसरली. त्यांना बांबवडे येथे श्रद्धांजली वाहण्यात आली . व उद्या, बुधवारी तालुका बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले. बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे बांबवडे व्यापारी संघटनेच्यावतीने व रणवीर गायकवाड युवा शक्तीच्या वतीने शोकसभा आयोजीत करून गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली. असाही योगायोग...उदयसिंगराव गायकवाड यांच्या पत्नी श्रीमंतीनीदेवी यांचा मृत्यू २००७ मध्ये २ डिसेंबरला झाला होता. आज २ डिसेंबर रोजीच उदयसिंगराव यांचे निधन झाले. या योगायोगाची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. उदयसिंगराव गायकवाड यांना मान्यवरांची श्रद्धांजलीउदयसिंगराव गायकवाड यांच्या निधनाने धुरंधर राजकारण्याला राज्य मुकले आहे. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात चांदोली धरण, गेळवडे मध्यम प्रकल्प, पाझर तलावाच्या माध्यमातून शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील हजारो एकर जमीन ओलिताखाली आली. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीउदयसिंगराव गायकवाड यांनी राजकीय जीवनात सत्तेची सगळी पदे भूषवली परंतु तरीही त्यांचा स्वभाव निगर्वी आणि सगळ््यांना सोबत घेऊन जाणारा होता. तब्बल दहा वर्षे त्यांच्यासोबत राजकारणात काम करण्याची संधी मिळाली.- विक्रमसिंह घाटगे, संस्थापक-अध्यक्ष ,शाहू सहकारी साखर कारखानाउदयसिंगराव गायकवाड व माझा दीर्घकाळाचा परिचय होता. आम्ही दोन भिन्न पक्षांत काम करत असलो तरी त्याचा अडसर कधीच आला नाही. त्यांचा एकूण व्यवहार धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणारा होता. - गोविंद पानसरे, ज्येष्ठ भाकप नेते, कोल्हापूर.खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे व्यक्तिमत्त्व हे वैयक्तिक नाती जपणारे होते. काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता व नेता अशी प्रतिमा त्यांनी शेवटपर्यंत जपली. कागल तालुक्यातील हमिदवाडा साखर कारखाना स्थापनेवेळी त्यांचे बहुमोल सहकार्य लाभले.- सदाशिवराव मंडलिक, माजी खासदारउदयसिंगराव गायकवाड यांचे सामान्य लोकांशी आपुलकीचे नाते असणाऱ्या या नेत्याने नेहमी समाजाला दिशा देण्याचे काम केले. एक लोकाभिमुख नेतृत्व, एक चांगला माणूस आज हरपला याचे दु:ख होत आहे. - डॉ. सा. रे. पाटील, माजी आमदार, शिरोळउदयसिंगराव गायकवाड यांच्या निधनाने कुशल राजकीय मार्गदर्शक हरपला आहे. काँग्रेस पक्ष व विचारांशी एकनिष्ठ राहून गायकवाड यांनी संसदेत आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला होता. विमानतळ, दूरदर्शन केंद्र, गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहत स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. - खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर. जिल्ह्याचा विकासात्मक कायापालट करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज गायकवाड यांच्यासारखे खंबीर नेतृत्व हरपले. गायकवाड यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. - महापौर तृप्ती माळवीउदयसिंगराव गायकवाड हे अजातशत्रू होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात त्यांचे बहुमोल असे योगदान आहे. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याची राजकीय हानी झाली आहे. - खासदार राजू शेट्टीमहाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जिल्ह्याचे पहिले मंत्री म्हणून उदयसिंगराव गायकवाड यांचे स्थान अढळ आहे. त्यांना मंत्री म्हणून मिळालेल्याा संधीचे त्यांनी सोने केले. खासदार म्हणूनही उदयसिंहराव गायकवाड यांनी दिल्लीच्या राजकीय क्षेत्रात आपली छाप पाडली. अशा ज्येष्ठ नेत्याची प्रतिमा कायमस्वरूपी स्मरणात राहील.- कल्लाप्पाण्णा आवाडे, अध्यक्ष, सहकारी साखर कारखान्यांचा राष्ट्रीय महासंघ, नवी दिल्लीउदयसिंग गायकवाड यांच्याशी १९५७पासून स्नेह होता. ते अतिशय सुस्वभावी व नम्र असे कॉँग्रेसचे कार्यकर्ते होते. ते आजारी असल्याने तूर्त भेट होऊ शकली नाही. मात्र, सहा महिन्यांपूर्वी त्यांच्याशी भेट झाली होती. मितभाषी सहकारी हरपल्याचे कायम दु:ख राहील. - डॉ. डी. वाय. पाटील, माजी राज्यपाल उदयसिंगराव गायकवाड हे मनमिळावू स्वभावामुळेच जिल्हा, राज्य व केंद्र सरकारच्या स्तरावर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. अशा या अजातशत्रू नेतृत्वाच्या निधनाने जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. - सहकारमंत्री चंद्रकांत पाटीलउदयसिंगराव गायकवाड हे माझ्या राजकीय वाटचालीतील गुरू. माझी राजकीय जडण-घडण केवळ त्यांच्यामुळेच घडली. त्यांचे बोट धरूनच राजकारणात आलो. अशा एका धुरंधर, मुत्सद्दी, राजकीय नेतृत्वाला जिल्हा पोरका झाला. - बाबासाहेब पाटील-सरुडकर, माजी आमदारउदयसिंगराव गायकवाड नेहमीच मला राजकारणात दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक म्हणून राहिले. ते वडिलांचे राजकीय मार्गदर्शक होते. - आमदार सत्यजित पाटील-सरुडकरसत्तेची हवा कधी डोक्यात जाऊ दिली नाही. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा व सामान्य माणसांबद्दलची कणव असल्यानेच जिल्ह्णातील सर्व सत्ताकेंद्रे त्यांच्याकडे होती. जिल्ह्णातील काँग्रेस वाढीत त्यांचे मोठे योगदान होते. - पी. एन. पाटील (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस) गायकवाड साहेबांनी जिल्ह्यातील राजकारणाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांनी अनेक सामान्य कार्यकर्त्यांना बळ देत राजकारणात उभे केले. जिल्ह्यातील सहकार व काँग्रेस पक्षाच्या वाढीत त्यांनी मोठे काम केले होते. - संपतराव पवार-पाटील, माजी आमदार जिल्ह्णातील अग्रणी नेते’ म्हणून अनेक वर्षे उदयसिंगराव गायकवाड यांनी नेतृत्व केले. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर पाठिंब्याची थाप देऊन प्रोत्साहित केले तसेच त्यांनी अनेक तरुण कार्यकर्त्यांना राजकारणात संधी दिली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. - आ. के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेसउदयसिंगराव गायकवाड यांच्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता महापौर होऊ शकला. त्यांच्यामुळेच आपल्याला काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांना जपणारा नेता गेल्याने कधीही भरून न निघणारी फार मोठी हानी झाली आहे.- अॅड. महादेवराव आडगुळे, माजी महापौरगायकवाडसाहेब गेल्याचे ऐकून अतिव दु:ख झाले. त्यांचे व डॉ. घाळी साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संंबंध होते. घाळी साहेबांच्या निधनानंतर मला त्यांचा मोठा आधार होता. त्यांच्या जाण्यामुळे हा आधार तुटला.- रत्नमाला घाळी, गडहिंग्लज, माजी अध्यक्षा, कोल्हापूर जिल्हा महिला काँगे्रस.भारदस्त व अजातशत्रू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या गायकवाडसाहेबांचा जिल्ह्यासह दिल्लीच्या राजकारणात दबदबा होता. त्यांच्या जाण्याने जिल्हा काँगे्रसची मोठी हानी झाली आहे.- भरमूअण्णा पाटील, चंदगड, माजी राज्यमंत्री.आपल्या राजकारणाची सुरुवात त्यांच्याबरोबरच झाली. नवीन कार्यकर्त्यांना ते पाठबळ देत. त्यांच्या कार्यामुळे भारावूनच आम्ही काँगे्रस वाढविण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या जाण्यामुळे निर्मळ मनाचा जोडीदार गमावल्याचे दु:ख आहे.- नरसिंगराव पाटील, चंदगड, माजी आमदार सज्जन, मनमिळावू व सुस्वभावी नेतृत्व हरपले. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांनी भाग घेतला. नामिबिया देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.- अॅड. श्रीपतराव शिंदे, गडहिंग्लज, माजी आमदार उदयसिंगराव गायकवाड यांच्यामुळेच मी आज कोल्हापुरात राहत आहे. गंगावे तालमीत कुस्तीचे धडे घेताना माझ्या मनात गावी परतण्याचा विचार आला. त्यावेळी मातीतील कुस्तीसाठी तुझी गरज असल्याचे सांगत मला थांबविले आणि त्यानंतर कुस्तीत कोल्हापूरचे नाव करण्याचे भाग्य मला लाभले. १९९६ मध्ये माझ्या पत्नीला सोळा दिवसांत आठवेळा हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी गायकवाड यांनी पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. संकटावेळी त्यांनी मला नेहमीच पाठबळ दिले आहे. त्यांना माझे कुटुंबीय व गंगावेश तालमीतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो. - हिंदकेसरी दीनानाथसिंहकोल्हापूरच्या कुस्तीला उदयसिंगराव गायकवाड यांनी मोठे बळ दिले. तालीम संघाचे अध्यक्ष, खासदार म्हणून कार्यरत असताना त्यांनी जिल्ह्णांतील पैलवान, तालमींना ताकद दिली. ग्रामीण भागात कुस्ती वाढविण्यासाठी त्यांनी काम केले. कुस्तीवर त्यांचे विशेष प्रेम होते. कुस्ती मैदानावेळी ते नेहमी पुढे असायचे. त्यांच्या निधनामुळे कुस्तीचा आधार तुटला आहे.- रुस्तम-ए-हिंद दादू चौगले
उदयसिंगराव गायकवाड यांचे निधन
By admin | Updated: December 3, 2014 00:39 IST