तुम्ही श्याम मनोहरांचं ‘शीतयुद्ध सदानंद’ वाचलंय? - बरं, ते जाऊदे! याच पुस्तकावर आधारित ‘लिमिटेड माणुसकी’ नावाचा एक सिनेमा आला होता. तो तरी तुम्ही आवर्जून पाहिला होतात का? हे पुस्तक किंवा हा सिनेमा वाचताना किंवा पाहताना ज्यांना खूप गंमत आली असेल त्यांनाच ‘ट्रिपल सीट’ची गंमत कशी अनुभवायची हे समजू शकेल.हिमांशू स्मार्त हा नव्या पिढीतला नाटककार. हा नाटककार कोल्हापूरचा रहिवासी असूनही आजची मराठी रंगभूमी त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहातेय. हिमांशू स्मार्तनी ‘ट्रिपल सीट’ लिहिताना ब्लॅक कॉमेडीच्या अंगानं जाणारं लेखन करण्याचा प्रयत्न केलाय. या पद्धतीचं लेखन करण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी, पण छोट्या मोठ्या व्यवहारज्ञानातल्या चुका मात्र राहून गेलेल्या असे ‘ट्रिपल सीट’ या संहितेचे स्वरूप झालेले आहे.आपण अनेकदा चुका करतो, कधी या चुका सोय म्हणून केलेल्या असतात, तर कधी सहानुभूतीपोटी केलेल्या असतात. मात्र, त्या चुका चुका म्हणून कबूल करायची आपली तयारी असत नाही, मग त्या चुकांच्या समर्थनासाठी पळवाटा शोधल्या जातात. त्यांना तत्त्वनिष्ठेचा मुलामा दिला जातो. ‘ट्रिपल सीट’नं नेमक्या या गोष्टीवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केलाय. उदाहरणार्थ शहर वाहतूक शाखेचा एक कॉन्स्टेबल पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी मोटरसायकलवरून ट्रिपल सीट निघालेल्या तीनशे जणांच्या मोर्चाकडे दुर्लक्ष करतो. कॉन्स्टेबल असला तरी नवरा म्हणून या बिचाऱ्या कॉन्स्टेबलला पाणी भरण्याचं काम करावंच लागत असतं आणि त्यामुळं पाणी प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी कुणी काही करतंय यामुळं मोर्चाला त्याची सहानुभूती असते. हाच कॉन्स्टेबल मुलीच्या अॅडमिशनसाठी स्कूटरवरून ट्रिपल सीट निघालेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाला मात्र कायदा मोडला म्हणून अडवतो, दंडपावती करण्याचा आग्रह धरतो. वैतागलेला माणूस आधी मोर्चातील तीनशेजणांना ट्रिपल सीटचा गुन्हा केल्याबद्दल पकडून आणून दंड करा, नाहीतर मीही काही गुन्हा केलेला नाही हे मान्य करा, असा तत्त्वनिष्ठेचा आग्रह धरतो. समुदायानं केला तर तो गुन्हा नाही आणि व्यक्तीनं केला तर तो मात्र गुन्हा असं कसं होऊ शकतं? कायदा सगळ्यांना सारखा नको का? असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उभे करत नाटक पुढे सरकत राहतं. प्रत्येक माणसाचा स्वत:चा म्हणून काही अवकाश आणि काळ असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबाचा, समाजाचा आणि समाजातील व्यवस्थांचा म्हणूनही स्वत:चा काही अवकाश व काळ असतो. हे अवकाश परस्परात मिसळले किंवा एक व्यवस्था दुसऱ्या व्यवस्थेत, एक व्यक्ती दुसरीच्या अवकाशात गेली की गोंधळ तयार होतो. काय बरोबर, काय चूक हे ठरवणंही अवघड होऊन बसतं. - म्हणूनच नाटकातला न्यायाधीशही गोंधळलेला. मध्यमवर्गीय माणूस मुलीला सांगून इंटरनेटवर वेबसाईट काढून, फेसबुक पेज सुरू करून आपल्या भूमिकेला जगभरातून व्हर्च्युअल पाठिंंबा मिळवणारा, तर न्यायाधीश एका चॅनलला हाताशी धरून खटल्याचा योग्य निकाल देण्यासाठी ‘मध्यमवर्गीयाकडून गुन्हा झाला आहे - होय नाही व माहीत नाही-असे तीन पर्याय देऊन एसएमएस मागवतो. यातूनही चूक-बरोबर काही ठरतंच नाही.एकूणच हा सगळा आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नाटकाचा बाज नीट समजावून घेणं अत्यंत आवश्यक. दिग्दर्शक अमीर शेख यांनी तो समजावून घेऊनच सर्व पात्रांच्या हालचाली, लकबी आणि अभिनयशैली निश्चित केल्याचे स्पष्टपणे जाणवले. पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना हीदेखील योग्यच. अभिनयाच्या बाबतीत सांगायचे तर हवालदाराच्या भूमिकेतील हेमंत धनवडे हे आपल्या अभिनयातील बारकाव्यांसह सगळ्यांत भाव खाऊन गेले. अभिजित कांबळेंनी चॅनलच्या अँकरचे केलेले विडंबन, रूचिका खोत यांनी सर्व गोष्टीतला केवळ थरार अनुभवण्यास उत्सुक तरूणपिढीचे केलेले प्रतिनिधित्व, अलीशा खान यांनी कुटुंबाच्या अवकाशातून बाहेर पडून दुसऱ्या अवकाशात गेल्यानंतर त्यांच्या दृष्टीत आणि पर्यायाने वागण्यातही होणारा दाखवलेला बदल या सगळ्याचीही दखल घ्यावी लागते. एकूण ‘ट्रिपल सीट’ हा एक वेगळ्या आशयाचा, वेगळ्या मांडणीचा प्रयत्न होता. तो प्रेक्षकांपर्यंत किती आणि कसा पोहोचला हे मात्र समजून घेणे औत्सुक्याचे ठरावे.‘ट्रिपल सीट’ - निर्मिती भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, कोल्हापूरनाटककार : हिमांशू स्मार्त, दिग्दर्शक अमीर शेख, नेपथ्य सर्जेराव सूर्यवंशी, अक्षय ढवळे, रोहन मिस्त्री, प्रकाशयोजना अंकुश कुलकर्णी, पार्श्वसंगीत अमर घाटगे, रंगभूषा संग्राम भालकर, वेशभूषा हर्षदा परीट, रंगमंच व्यवस्था गौरव भालकर, सुजय पाटील व सूरज मोरे.पात्रपरिचय-माणूस-सुहास भास्कर, बायको अलीशा खान, हवालदार-हेमंत धनवडे, न्यायाधीश-समीर पंडितराव, मुलगी- रूचिका खोत, वार्ताहर- अभिजित कांबळे.आजचे नाटकआजचा ‘एकच प्याला’ हा नाट्यप्रयोग रद्द झालेला आहे.
एक वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न ‘ट्रिपल सीट’
By admin | Updated: November 21, 2014 00:33 IST