अतुल आंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे राजकीय हालचाली गतिमान होत आहेत. एकसदस्यीय प्रभाग रचना होणार असल्याने इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू असून, ठरावीक वॉर्डात उमेदवारांची गर्दीही वाढणार आहे. राजकीय पक्ष, स्थानिक आघाड्या यांच्या भूमिका अद्याप स्पष्ट झाल्या नसल्या, तरी प्रामुख्याने तिरंगी लढतीची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सर्वांत मोठी व अ वर्ग श्रीमंत नगरपालिका म्हणून इचलकरंजी नगरपालिकेची ओळख आहे. पालिकेच्या विद्यमान सभागृहात ३१ प्रभाग व ६२ नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष असे पदाधिकारी आहेत. २०११ ची लोकसंख्या गृहीत धरून २०१६ ला निवडणूक झाली होती. यंदाही त्यावेळचीच लोकसंख्या गृहीत धरली जाणार आहे. परंतु, आठ प्रभागात विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्या वाढल्याने सहायक मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली होती. प्रभाग रचना व त्या प्रभागातील मतदान संख्या विचारात घेतल्यास ६२ या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. २०१६ च्या निवडणुकीत त्रिसदस्यीय प्रभाग रचना असल्याने एखाद्या सामान्य उमेदवाराला अन्य उमेदवार सोबत ओढून नेत होते. आता वैयक्तिक प्रभाग रचना असल्याने स्वत:ची ताकद लावावी लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी गेल्या काही महिन्यांपासून भागामध्ये जनसंपर्काबरोबर कार्यक्रम वाढविले आहेत. ग्रामपंचायतीप्रमाणेच नगरपालिकेत नगराध्यक्षही थेट जनतेतून निवडण्याऐवजी विजयी सदस्यांतूनच निवड होण्याची शक्यता आहे.
नव्या उमेदवारांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी, तर विद्यमान नगरसेवक आपली उमेदवारी कायम ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात राहत आहेत.
आमदार प्रकाश आवाडे यांनी स्व:बळावर ताराराणी पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांचा गट, त्यानंतर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा गट आणि समीकरणे जुळून आल्यास महाविकास आघाडी एकत्रित अशी निवडणूक होऊ शकते. त्याचबरोबर आणखी काही आघाड्या यातील कोणाबरोबरही न जुळल्यास त्यांचे प्राबल्य असलेल्या काही जागांवर निवडणूक लढवतील, अशी स्थिती आहे. यामध्ये प्रामुख्याने सागर चाळके, खासदार धैर्यशील माने, माकप यांच्या भूमिकेकडेही लक्ष राहणार आहे.
पालिकेतील सद्य:स्थिती
सध्या नगरपालिकेमध्ये आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर व राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांची संयुक्त सत्ता आहे. निवडणुकीनंतर पहिल्या टप्प्यात हाळवणकर यांनी राष्ट्रवादीतील जांभळे गट व ताराराणी आघाडी यांच्यासोबत सत्ता स्थापना केली होती. विधानसभा निवडणुकीनंतर तेथील चित्र बदलले. आताची विचित्र परिस्थिती पाहता संभ्रमावस्था आहे.
स्थापना सन १८९३ मध्ये
जहागीरदारांच्या कालावधीत इचलकरंजी नगरपालिकेची स्थापना झाली. मात्र, स्वातंत्र्यानंतरच संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आले.