कोल्हापूर : यंदाही गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बीची धूम कायम राहण्याची चिन्हे आहेत. अनेक मंडळांनी डॉल्बी सिस्टीमसह अत्याधुनिक लेझर शो, एलईडी वॉल, फ्लाइंग मशीन, एअरशिप कॅमेरासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मिरवणुकीत करण्याचा घाट घातला आहे. यामध्ये हिंदवी स्पोर्टस्, दयावान, संध्यामठ, बीजीएम ही मंडळे यावर्षीही मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहेत. हिंदवी स्पोर्टस्ने अत्याधुनिक लेझर शो, शार्पी लाईट, एलईडी वॉल, फ्लार्इंग मशीन, एअरशिप कॅमेरा, याचबरोबर रात्रीच्या वेळी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हातात वेगळ्या प्रकारच्या ५०० स्टिक कँडल देण्यात येणार आहेत. याशिवाय व्हिडीओ जॉकी, वाय-फाय यंत्रणेचा वापर मिरवणुकीत करणार आहे. तर ताराबाई रोडचा दयावान हा गु्रपही यंदा ट्रान्स लेझर शो, लाईट इफेक्ट, आकर्षक गणेश आरास आदींची वेगळी मांडणी मिरवणुकीत सादर करणार आहे. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाच्यावतीने यंदा पुणे येथील डीजेसह डॉल्बी सिस्टिम मिरवणुकीत आणली जाणार आहे. महाकाली तालीम भजनी मंडळानेही अमृतमहोत्सवानिमित्त डॉल्बीसह पारंपरिक वाद्यांचा गजरही मिरवणुकीत आणण्याचा घाट घातला आहे. रंकाळावेश येथील गोल सर्कलने यंदा पुणे येथील ६४ जणांचे ढोल पथक मिरवणुकीत आणले जाणार आहे. बहुतांश मंडळांनी स्थानिक डॉल्बी सिस्टीम गणेशोत्सवाअगोदरच आरक्षित करून ठेवली आहे. यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीचा बंदोबस्तही करून ठेवला आहे. त्यामुळे यंदाच्या मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट सर्वसामान्य गणेशभक्तांना मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे.(प्रतिनिधी)
यंदाही ‘डॉल्बी’ दणाणणार!
By admin | Updated: September 7, 2014 00:47 IST