सांगली : विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेपुरता अभ्यास न करता, आयुष्य समृध्द करायचे असेल तर त्यांना अवांतर वाचनाशिवाय पर्याय नसल्याचे मत ‘वाचन : एक जडणघडण’ या विषयावरील परिसंवादात आज, बुधवारी विविध मान्यवरांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कच्छी जैन भवन येथे आयोजित ग्रंथोत्सव प्रदर्शनात परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन होते. परिसंवादात बोलताना प्रा. डॉ. विष्णू वासमकर म्हणाले, वाचनामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परिवर्तन होण्यास मदत होते. संकटकाळात आपल्याला ग्रंथाचीच साथ उपयोगी पडते. परंतु सध्या शालेय विद्यार्थी केवळ गुण मिळविण्यासाठी अमभ्यासक्रमाला लावलेल्या पाठ्यपुस्तकांचाच अभ्यास करतात. त्यांचे अवांतर वाचन कमी झाले आहे. त्यामध्ये वाढ केल्यास जीवन समृध्द होण्यास मदत होईल.प्राचार्य विश्वास सायनाकर म्हणाले, अवांतर वाचनामुळे आपल्याला अनेक व्यक्तींचे अनुभव कळतात आणि त्यातून आपल्याला शिकता येते. कोल्हापूर शिक्षण विभागाचे सहायक संचालक संपत गायकवाड म्हणाले की, आयुष्याच्या परीक्षेसाठी अवांतर वाचनाला पर्याय नाही. ग्रंथाला मित्र करणे गरजेचे आहे. याकरिता विद्यार्थ्यांनी तहान-भूक विसरुन वाचन केले पाहिजे.यावेळी प्रा. वैजनाथ महाजन यांनी, ग्रंथ वाचनाने विचार करण्याची शक्ती मिळते, याकरिता अवांतर वाचन करावे, असे आवाहन केले.(प्रतिनिधी)शाळांनी ग्रंथ वाचन उपक्रम राबवावाग्रंथ पालखीचे पूजन अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार पवार आणि कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी यांच्याहस्ते करण्यात आले. दिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान केले होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी एस. आर. माने, शिक्षणाधिकारी मधुकर यादव उपस्थित होते. वाचन संस्कृतीच्या वाढीसाठी शाळांमधून ग्रंथ वाचनाचा उपक्रम राबवावा, असे मत ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांनी ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी, नागरिकांनी विविध ग्रंथांचे वाचन करुन आयुष्य समृध्द करावे, असे आवाहन केले.
अवांतर वाचनाला सध्या पर्यायच नाही
By admin | Updated: March 9, 2015 23:43 IST