"कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल, आम्ही निवडणुकीत त्याग केलाय", शिंदेंच्या नेत्याचे विधान, भाजपाची कोंडी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 21:38 IST2026-01-21T21:32:13+5:302026-01-21T21:38:22+5:30
Kolhapur mayor 2026: कोल्हापूरमध्ये शिंदेसेनेने महापौर पदावर दावा केला आहे. महायुतीत सर्वाधिक जागा भाजपाने जिंकल्या आहेत. मात्र, शिंदेसेनेच्या मागणीने भाजपाची कोंडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

"कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल, आम्ही निवडणुकीत त्याग केलाय", शिंदेंच्या नेत्याचे विधान, भाजपाची कोंडी?
Kolhapur Mayor Election 2026: कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुतीने गुलाल उधळला, पण महापौर पदावरून आता संघर्ष सुरू झाल्याचे दिसत आहे. "नैसर्गिक हक्काने कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल", असे विधान शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. भाजपाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या असताना क्षीरसागर यांनी महापौर पदावर दावा केल्याने महायुतीत पेच झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शिंदेसेनेचे आमदार आणि कोल्हापुरातील महत्त्वाचे नेते राजेश क्षीरसागर म्हणाले, "कोल्हापूर महापालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोर जावे, असा माझा प्रामाणिक हेतू होता. युतीमध्ये कोणताही मिठाचा खडा पडू नये, यासाठी माझा प्रयत्न आहे. या निवडणुकीत शिवसेनेने मोठा त्याग केला आहे."
शिंदेसेनेचा महापौर पदावर दावा का?
"विधानसभेत कोल्हापूर उत्तरची प्रत्येक पेठ शिवसेनेसोबत होती. त्याची थेट पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीतही झाली आहे. या निवडणुकीत भाजपाच्या २६, शिवसेनेच्या २४ आणि जनसुराज्य एक अशा ४६ जागा आल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक हक्काने कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल", असे विधान क्षीरसागर यांनी केले आहे.
शिंदेसेना काँग्रेससोबत जाणार का?
"नकारात्मक नरेटिव्ह तयार करणाऱ्या बादशाहांना पुन्हा एकदा शिवसेनेा आणि एकत्र येणार असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना मुख्य नेता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी देखील भूमिका स्पष्ट करतो. कोल्हापूर महापालिकेमध्ये महायुती म्हणूनच सत्ता स्थापन करू", अशी भूमिका आमदार क्षीरसागर यांनी काँग्रेससोबत जाण्याबद्दच्या चर्चांवर मांडली.
"२३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांची कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकावण्याची इच्छा आता पूर्ण होत आहे. कोल्हापूर महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर होणार", असा पुनरुच्चार त्यांनी केला.
शहाणे समजणाऱ्यांना जनतेने उत्तर दिले
आमदार क्षीरसागर म्हणाले, "कसबा बावड्यात पराभूत झालेल्या आमच्या उमेदवारांनी आज माझी भेट घेतली. कसबा बावड्यात बोगस मतदान कसे नोंदवले जाते. दादागिरी कशी चालवली जाते, याची माहिती त्यांनी मला दिली. त्या ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाले असले, तरी विजय आमचाच झाला आहे. बोगसगिरी करून शेवटी मी फार मोठा शहाणा आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीला लोकांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे", अशी टीका त्यांनी सतेज पाटील यांच्यावर केली.