अनिल पाटील - मुरगूड --गेल्या चार ते पाच वर्षांत अगदी शालेय कुस्ती स्पर्धेपासून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत चपळतेने प्रतिस्पर्धी मल्लांना अस्मान दाखवीत अनेक पदकांवर नाव कोरणारी मुरगूड (ता. कागल) येथील महिला मल्ल स्वाती संजय शिंदे हिचा कुस्तीतील प्रवास थक्क करणारा आहे. मुरगूड शहराचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचविण्याचे काम तिने केले आहे. स्वातीच्या कामगिरीची नोंद होऊन शासनाने तिला शासकीय नोकरी देऊन तिचे कौतुक करतानाच कुस्तीला नवसंजीवनी देण्याची गरज आहे.मुरगूड शहरासह परिसरातील गावांच्या आठवडी बाजारात जनावरांची खरेदी-विक्री करणारे संजय शिंदे यांची स्वाती ही मुलगी. संसाराचा गाडा ओढताना दमछाक होत असतानासुद्धा कुस्तीमध्ये करिअर करणाऱ्या आपल्या मुलीचा न परवडणारा खुराक आणि स्पर्धेसाठी येणारा प्रवास खर्च याने हतबल न होता मुलीच्या पाठीवर हात ठेवून तिला प्रोत्साहन दिले. आपल्या वडिलांचा प्रोत्साहनाचा हात असल्याने स्वातीने गेल्या काही वर्षांमध्ये विविध स्पर्धांत पाच सुवर्णपदकांसह रौप्यपदक, कांस्यपदक मिळविले. स्वाती सध्या मुरगूडमधील सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलामध्ये (साई आराखडा) कुस्तीतील अद्ययावत डावपेचांचे धडे घेत आहे. तिला याठिकाणी प्रशिक्षक दादासाहेब लवटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रणजित पाटील, प्रवीणसिंह पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे. सन २०११-१२ या शैक्षणिक वर्षामध्ये स्वातीने बालेवाडी, पुणे येथे झालेल्या १९ वर्षांखालील शालेय राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत ४४ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवीत राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रासह मंडलिक आखाड्याचा दबदबा निर्माण केला. त्याचवर्षी हरियाणा येथे झालेल्या १६ वर्षांखालील राष्ट्रीय ग्रामीण कुस्ती स्पर्धेत स्वातीला ४३ किलो वजन गटात रौप्यपदक मिळाले. उत्तर प्रदेश येथील इटावा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ४४ किलो वजन गटात रौप्यपदक, तर हरियाणा येथे सैनिवत या ठिकाणी ४६ किलो वजन गटामध्ये सुवर्णपदकावर तिने नाव कोरले. लखनौ येथे अखिल भारतीय कॅडेट कुस्ती निवड स्पर्धेत स्वातीने दिल्ली, हरियाणा येथील महिला मल्लांना धूळ चारल्याने थायलंडमधील बॅँकॉक येथील आंतरराष्ट्रीय आशियाई स्पर्धेसाठी ४६ किलो वजनी गटात तिची निवड झाली. स्वातीच्या वडिलांची जिद्द आणि तिच्या कुटुंबीयांनी तिला दिलेले प्रोत्साहन यामुळेच तिने ही कामगिरी केली. ती शिवराज कॉलेजमध्ये बारावीमध्ये शिकते. तिला चंद्रकांत चव्हाण, ‘शिवराज’चे प्राचार्य महादेव कानकेकर, सुखदेव येरूडकर यांचे प्रोत्साहन, तर एन.आय.एस. कोच दादासाहेब लवटे यांचे तिला प्रशिक्षण मिळाले.
स्वाती शिंदेचा अटकेपार झेंडा
By admin | Updated: November 10, 2014 00:43 IST