राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पंधरा-वीस वर्षांपूर्वी ज्वारी हे गरिबांचे धान्य समजले जायचे, गहू फक्त सणासुदीलाच खाल्ला जायचा. मात्र आता परिस्थिती उलटी झाली असून आता ज्वारीची श्रीमंती वाढली असून गव्हापेक्षा दुप्पट भाव झाला आहे. त्यामुळे ताटात भाकरीऐवजी चपाती दिसू लागली आहे.
कोल्हापूर जिल्हा पाणीदार म्हणून ओळखला जात असला तरी साधारणता तीस-चाळीस वर्षांपूर्वी येथे सिंचन कमी होते. त्यामुळे कमी पाण्यावर येणारी पिके घेतली जायची. ज्वारी, मका, कडधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात. गव्हाला ज्वारीच्या तुलनेत पाणी अधिक लागत असल्याने उत्पादन कमी होते. प्रत्येकजण स्वत: पुरते ज्वारी पिकवत होते. आता परिस्थिती बदलली आहे. नगदी पीक म्हणून उसाकडे शेतकरी वगळले आहेत.
साधारणता उंची शाळू व ज्वारी ५० रुपये किलो आहे. या तुलनेत गव्हाचे दर २५ रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे एका किलो ज्वारीत दोन किलो गहू येतो. सध्या महागाईने हिमटोक गाठल्याने अशा परिस्थितीत महागडे धान्य खाणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहे.
उसाने घेतली ज्वारीची जमीन
पूर्वी कोल्हापूरसह कर्नाटक, सोलापूर जिल्ह्यात सिंचन कमी असल्याने ज्वारी व शाळूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. आता या भागात पाणी झाल्याने उसाचे मळे फुलले आहेत. तर अनेक ठिकाणी सूर्यफूल, तुरीचे उत्पादन शेतकरी घेऊ लागल्याने ज्वारीचे उत्पादन कमी झाले आणि मागणी तीच राहिल्याने दर वाढले आहेत.
रेशनवरील धान्य वाटपाचाही परिणाम
केंद्र सरकारने रेशनवर गहू मोठ्या प्रमाणात देण्याचा निर्णय घेतला. एका कुटुंबाला किमान दहा किलो गहू तेही तीन रुपये दराने मिळतो. त्यामुळे ५० रुपये किलो ज्वारी, शाळू घेण्यापेक्षा त्यामध्ये रेशनवरील गहू खाण्याकडे ओढा वाढला आहे.
आरोग्याची श्रीमंतीही ज्वारीतच
माणसाला हलके अन्न लवकर पचते त्यामुळे त्या जेवणाचा त्रास होत नाही. चपातीच्या तुलनेत भाकरी पचायला खूप हलकी आहे. त्याचबरोबर भाकरीतील कणीदारपणामुळे ताकद वाढण्यास मदत होते. कष्टाची काम करणाऱ्यांना भाकरीच उपयुक्त असून ती खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कोट-
भाकरी हे खरोखरच गरिबांचे धान्य होते. किमतीबरोबरच खाल्यानंतर पोटालाही त्रास नव्हता. मात्र आता नाईलाजास्तव चपाती खावी लागत आहे. चपातीचा वयोवृद्धांना खूप त्रास होतो.
- अशोक डवरी (शिवाजी पेठ, कोल्हापूर)
१) अशी वाढली ज्वारीची श्रीमंती (प्रति क्विंटल दर)
वर्ष ज्वारी गहू
१९८० १५० ते १८० १९० ते २२०
१९९० ८०० ते १२०० १५०० ते १७००
२००० १५०० ते १८०० २००० ते २३००
२०१० २००० ते ३००० २२०० ते २७००
२०२१ ३५०० ते ४५०० २२०० ते ३०००