संदीप बावचे -शिरोळ -तेरवाड बंधाऱ्यातून पाणी खाली सोडण्यात आल्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा व पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनणार आहे. कर्नाटकातील हिप्परगी धरणाच्या बॅकवॉटरमुळे तालुक्याला दूषित पाण्याचा सामना करावा लागणार आहे. सध्या म्हैशाळ बंधाऱ्यापर्यंत बॅकवॉटरचा परिणाम दिसून येत आहे. यामुळे दूषित पाणीप्रश्नी उपाययोजना राबविण्याची गरज आहे.पंचगंगेला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तेरवाड बंधाऱ्यावर पाणी अडवून तालुक्यातील बहुतांशी गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या नदीमध्ये धरणातील पाण्याचा विसर्ग कमी असल्याने इचलकरंजीसह परिसरातील सांडपाण्याबरोबर औद्योगिकरणाचे पाणी नदीत सोडले जात असल्याने पाणी काळेकुट्ट झाले आहे. तेरवाड बंधाऱ्याला तटून पाण्यामध्ये माशांचा थर लागल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. काल, सोमवारी कुरुंदवाड पाटबंधारे विभागाने तेरवाड बंधाऱ्याच्या चार सांडव्यांचे बरगे काढून पाणी वाहते केले. त्यामुळे या बंधाऱ्याला तुंबलेले जलपर्णी, मेलेले मासे वाहून पुढे गेले. हेच पाणी नृसिंहवाडीजवळ कृष्णेत मिसळणार आहे. हिरवट व काळेकुट्ट पाणी शिवाय मृत झालेले जलचर असलेले पाणी बहुतांशी गावांना पुरविले जाणार असल्याने साथीच्या आजारांचा फैलाव होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या कर्नाटकातील हिप्परगी धरणाच्या बॅकवॉटरमुळे सांगलीतील म्हैसाळ बंधाऱ्यापर्यंत नदीचे पाणी स्थिर दिसून येते. यामुळे प्रदूषित पाणी पुढे प्रवाहित होणार नाही. याचा परिणाम प्रदूषित पाणी तुंबून राहण्यावर होणार आहे. दरवर्षी दूषित पाण्यावरून आंदोलन होते. आता पंचगंगा, कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा पेटणार आहे. गुन्हे दाखल करा : पाटीलकुटवाड व कनवाड येथील दूषित पाणीप्रश्नी आमदार उल्हास पाटील यांनी आज, मंगळवारी नदीची पाहणी केली. यावेळी पाटबंधाऱ्याचे अधिकारी, तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी किसूरकर, प्रदूषण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी तपासणीसाठी पाण्याचे नमुनेही घेण्यात आले. दरम्यान, नदी प्रदूषित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे पाटील यांनी सांगितले.पावसाळ्यात ‘अलमट्टी’, तर उन्हाळ्यात ‘हिप्परगी’१पावसाळ्यात कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे शिरोळ तालुक्याला महापुराला सामोरे जावे लागते. २दरवर्षी अलमट्टीवरून चर्चेचे गुऱ्हाळ रंगते. अलमट्टीचे हे भूत मानगुटीवर बसले असताना उन्हाळ्यात हिप्परगी धरणाच्या बॅकवॉटरमुळे दूषित पाण्याचा सामना शिरोळ तालुक्याला करावा लागत आहे. ३यामुळे महाराष्ट्र शासनाने कर्नाटक शासनाशी समन्वय साधून हिप्परगी धरणप्रश्नी उपाययोजना राबविण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.
शिरोळमध्ये दूषित पाणीप्रश्न पेटणार
By admin | Updated: January 21, 2015 00:10 IST