उत्तूर : आजरा शहराकडून भादवण येथे आलेल्या हत्तीने केलेल्या हल्ल्यात एकजण डोक्यास गंभीर मार लागल्याने जखमी झाला, तर दुसरा नदीतून पोहत पलीकडे गेल्याने बचावला. विजय कृृष्णा गोरे (वय ३८, रा. भादवण) हे जखमी झाले, तर कृष्णा पुंडपळ (रा. भादवण) हे बचावले. आज, मंगळवारी ही घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आजरा शहरातून काल, सोमवारी सायंकाळी दाखल झालेला हत्ती भादवण येथील संजय देवरकर यांच्या उसाच्या शेतात लपला होता. सकाळी आठच्या सुमारास देवरकर यांच्या शेताकडे कृष्णा पुंडपळ गवत आणण्यासाठी गेले होते. नदीकाठी हत्ती असल्याचे लक्षात येताच धावत येताना पाहून त्यांनी हिरण्यकेशी नदीपात्रात उडी मारली. ते पोहत पलीकडे गेले. तेथून गावात येऊन ग्रामस्थांना व वनविभागाला कळविले.माहिती मिळताच वनविभागाचे पथक भादवण येथे दाखल झाले. ग्रामस्थांनी तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हत्तीला जंगलात हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुपारच्या सुमारास हत्ती पुन्हा देवकरांच्या उसात दिसला. तीन वाजता विजय गोरे शेतात होते. ते हत्ती आला आहे, असे फोनवरून रामा गोरे यांना सांगत होते. एवढ्यात हत्तीने त्यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यामध्ये हत्तीचे सुळे कानाच्या बाजूस लागल्याने ते खाली पडले. हत्ती त्यांच्या अंगावरून पलीकडे गेला. चुकून जर त्यांच्या अंगावर पाय पडला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. जखमी अवस्थेत गोरे यांनी नातेवाइकांना फोनवरून ही बातमी सांगितली. नातेवाइकांनी शेतातून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, भादवण येथे नेले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे दाखल करण्यात आले. हत्तीने भादवण परिसरातील भात व ऊस पिकांचे मोठे नुकसान केले. भादवण परिसरात हत्तींचा वावर वाढल्याने वनविभागाने ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.दरम्यान, रात्री सातच्या सुमारास हत्ती खेडे येथील परिसरात असल्याचे वनअधिकारी राजन देसाई यांनी सांगितले. (वार्ताहर)
हत्तीच्या हल्ल्यात एक गंभीर; एकजण बचावला
By admin | Updated: August 26, 2014 22:19 IST