कोल्हापूर : प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या अभिलेख कक्षातील अभिलेखाची शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी करून जतन व संरक्षण करा, अशा सूचना देत पुराभिलेख संचालनालय, मुंबईचे सहायक संचालक रा. ऊ. दांदले यांनी आज, शनिवारी उपस्थित प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात पुराभिलेख संचालनालय यांच्यातर्फे जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच महामंडळे येथील अभिलेखांशी संबंधित काम करणार्या कर्मचार्यांसाठी ‘अभिलेख व्यवस्थापनशास्त्र प्रशिक्षण’ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे, तहसीलदार सुनीता नेर्लीकर, नायब तहसीलदार सरस्वती पाटील, कोल्हापूर पुराभिलेखागार कार्यालयातील सहायक संचालक गणेशकुमार खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. दांदले म्हणाले, शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शासनाने स्थापन केलेली महामंडळे, आयोग, समित्या संस्था यांच्या कार्यालयातील सार्वजनिक अभिलेखांचे व्यवस्थापन, प्रशासन आणि जतन यांचे विनियमन करणारा ‘महाराष्टÑ सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५’ हा १५ फेब्रुवारी २००६ पासून अंमलात आलेला आहे. या अधिनियमातील तरतुदीचे योग्य पालन होण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशकुमार खोडके यांनी पुराभिलेख संचालनालयाची तसेच या संचालनालयातील ऐतिहासिक कागदपत्रांची माहिती व महत्त्व, तसेच प्रत्येक कार्यालयाच्या कक्षातील अभिलेखांची शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी, वर्गवारी, जतन व संरक्षण करणे यांबाबत सविस्तर माहिती दिली. कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयातील संशोधन सहायक स. स. लाटकर यांनी प्रास्ताविक केले. अभिलेखा पाल सं. भू. आवळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन मोडीज्ञात सहायक विक्रम ठमके, वरिष्ठ लिपिक बा. ना. कुंडले यांनी केले. यावेळी महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालये यांसह जिल्ह्यातील शंभरहून अधिक कार्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अभिलेखांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करा
By admin | Updated: June 1, 2014 01:22 IST