आदित्य वेल्हाळ - कोल्हापूर --सिद्धाळा गार्डन येथील कॅशिया व पेट्रोफोरम या जुन्या झाडांवर पाणकावळ्यांची सुमारे सव्वाशे घरटी आहेत. त्यांची विष्ठा आणि दुर्गंधी याचा त्रास येथे मॉर्निंग वॉक करायला येणाऱ्या आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होत आहे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील अतिजागरूक रहिवासी आणि मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांनी उद्यान विभागाकडे केली आहे.उद्यान विभागाने हा बंदोबस्त केल्यास पक्ष्यांचा अधिवासच धोक्यात येण्याची शक्यता आहे. पाणकावळा हा शहरातील नदीकाठी, रंकाळा, कळंबा, पद्माळा, न्यू पॅलेस, शिवाजी विद्यापीठ, राजाराम तलाव या परिसरात आहे. पिलांना आवश्यक सुरक्षित जागा, हवामान, अन्न या बाबींचा विचार करून घरट्यांची जागा निवडतात. एकदा निवडलेली जागा पुढच्या वर्षी निवडत नाहीत. सध्या या उद्यानातील या पाहुण्यांच्या तात्पुरत्या वास्तव्यामुळे विष्ठा पडणे साहजिकच आहे, पण याचा त्रास ‘मॉर्निंग वॉक’ करायला येणाऱ्या नागरिकांना आणि रहिवाशांना सहन होईनासा झाला आहे. लहान मुलेही पाणकावळयांच्या घरट्यांवर दगडे मारतात. त्यामुळे या घरट्यांतील पिल्ले खाली पडून मृत होत आहेत. रहिवाशी आणि मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना त्याबद्दल कोणतेच सोयरसुतक वाटत नाही. वन्यजीव संरक्षण कायदा, वृक्ष जतन कायदा व जैवविविधता कायद्यान्वये नैसर्गिक अधिवासात एखाद्या झाडावर कोणत्याही पक्ष्याने घरटी करून अंडी घातल्यास त्यातून पिल्लांचा जन्म होऊन ती उडून जाईपर्यंत या झाडांना संरक्षण देणे आवश्यक आहे. या पक्ष्यांचा अधिवास नष्ट करण्याची कृती गंभीर व शिक्षेस पात्र आहे. पाणकावळ्यांच्या अंड्यातून बाहेर पडलेल्या या पिल्लांच्या पंखात बळ येईपर्यंत नागरिकांनी या चिमुकल्यांना जगू द्यावे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून पक्ष्यांमुळे निर्माण होणारी अस्वच्छता किमान महिनाभर तरी महापालिकेने दूर करावी. आपली संस्कृती दया, क्षमा, शांती शिकविते. नागरिकांनी या घरट्यांकडे संवेदनशीलतेने पाहावे असे वाटते.
पाणकावळ्यांच्या अधिवासाला ‘मॉर्निंक वॉक’चा धोका
By admin | Updated: August 19, 2015 01:02 IST