कोल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवस दमदार पाऊस सुरू आहे. दिवसभर उघडीप असली तरी रात्रभर पावसाची रिपरिप सुरू असते. गगनबावडा, शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांत जोरदार पाऊस होत असून, धरणक्षेत्रातही चांगला पाऊस आहे. धरणांतील पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांची पातळी फुगली आहे. पंचगंगा २४ फुटांवर पोहोचली असून, १८ बंधारे पाण्याखाली आहेत. सूर्याने ३० सप्टेंबरला ‘पूर्वा’ नक्षत्रात प्रवेश केला आहे. वाहन मोर असल्याने या काळात पाऊस लागणार नाही, असा अंदाज होता. सुरुवातही उघडझापनेच झाली; पण गेले दोन दिवस दमदार पाऊस सुरू आहे. दिवसभर थोडी विश्रांती घेऊन सायंकाळनंतर पाऊस सुरू होतो. जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस आज सकाळपर्यंत एकसारखा सुरू राहिला. सायंकाळनंतर गणेश मंडळाचे देखावे खुले होतात. नेमका याच वेळी पाऊस सुरू होत असल्याने नागरिकांना देखावे बघण्यासाठी बाहेर पडणे मुश्कील बनले आहे. सकाळी अकरानंतर पावसाने थोडी उसंत घेतली. आज, शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २४.३९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस १०५ मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ७७ टक्के पाऊस झाला असून कागल, शाहूवाडी व भुदरगड तालुक्यांनी सरासरी ओलांडली आहे. राधानगरी तालुक्याची सरासरी अजूनही ४३ टक्क्यांवरच आहे. धरणक्षेत्रात सरासरी ७५ मिलिमीटर पाऊस झाला असून, विसर्ग वाढला आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद २ हजार, वारणातून ११ हजार १९७, दूधगंगेतून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भोगावती, वारणा, पंचगंगेच्या पातळीत वाढ झाली आहे. विविध नद्यांवरील अठरा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा -करवीर - १२.१४, कागल - ५.८१, पन्हाळा - ३८.४२, शाहूवाडी - ५६.६६, हातकणंगले - ५.५०, शिरोळ - १.४२, राधानगरी - २२, गगनबावडा - १०५, भुदरगड - १०.२०, गडहिंग्लज - ३.२८, आजरा - १५.९०, चंदगड - १६.३३.
गगनबावडा, शाहूवाडीत दमदार पाऊस
By admin | Updated: September 7, 2014 00:53 IST