लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत ४२ हजार ६०० हेक्टर (७० टक्के) बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. इतर तालुक्यांच्या तुलनेत जास्त नुकसान झालेल्या करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील पंचनामे व्हायचे आहेत. येत्या दोन दिवसांत हे तीन तालुके वगळता इतर ठिकाणचे पंचनामे पूर्ण होतील, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी व महापुराने शेतीचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात साधारणत: ६० हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू झाले आहेत. सुरुवातीच्या टप्यात नदीकाठावरील पिकांमध्ये पाणी, चिखलामुळे पंचनाम्याच्या कामाला फारशी गती नव्हती. आता गती आली असून मंगळवारपर्यंत ४२ हजार ६०० हेक्टरवरील बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित ३० टक्के क्षेत्राचे पंचनामे व्हायचे असून यामध्ये करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील अधिक क्षेत्र आहे. या तीन तालुक्यात बाधित क्षेत्र अधिक असल्याने पंचनाम्यास विलंब होत आहे. हे तीन तालुके वगळता येत्या दोन दिवसांत इतर तालुक्यांतील पंचनाम्याचे काम पूर्ण होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.