राम मगदूम ल्ल गडहिंग्लज एमएच ०९ बीबी ७५९ या लाल रंगाच्या फोर्ड फिएस्टा गाडीतून आलेल्या चार पोलिसांनी काल, शुक्रवारी गडहिंग्लजमध्ये अक्षरश: धिंगाणा घातला. रोख पावणेचार लाखांसह साठीतील व्यापारी व दुकानाच्या मॅनेजरचे अपहरण केले. ‘मोक्का’ कायद्याची भीती दाखवून चक्क २५ लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणामुळे सर्वसामान्यांत मात्र दहशत निर्माण झाली आहे. अशी घडली घटना ४शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ते चौघे पोलीस अगदी सिनेस्टाईलने भरवस्तीतील कडगाव रोडवरील ‘गंगुआक्का’ निवासातील भाडेकरू व्यापारी हबीब इब्राहिम रावतार यांच्या घरात घुसले. ४हबीब यांचा नातू नसरुद्दीन (वय १९), वयोवृद्ध स्वयंपाकी साहुल (६०) यांना हबीबला बोलाविण्यासाठी फोन लाव म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली. ४दरम्यान, नसरुद्दीनने हबीब यांचे मॅनेजर महंमदसिद्दीकबाबू मत्तुमोहमद रावतार व अब्दुलवाहिद लतीफ रावतार यांना बोलावून घेतले. तत्पूर्वी बाजूच्या खोलीतून हबीब यांचा मुलगा सद्दामहुसेन दुकानात आला. त्याचाही त्यांनी ‘समाचार’ घेतला. ४तक्रारीचा एक अर्ज दाखवत तुम्ही १० ते ५० टक्के व्याजाने पैसे देता असे धमकावत तिजोरीतील तीन लाख ८५ हजारांची रक्कम काढून घेतली. अगदी दोन हजारांची चिल्लरदेखील सोडली नाही. ४जमिनीवर रक्कम आणि कागदपत्रे ठेवून तिघांचेही आरोपीसारखे फोटो काढले. तिथल्याच तीन काळ्या बॅगेत व दोन प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये रक्कम भरली. ४दुकानातील व्यक्तींकडील पाच मोबाईल त्यांनी काढून घेऊन ‘स्विच आॅफ’ करून टाकले. दुपारी दोनच्या सुमारास हबीब घरी पोहोचले. त्यांनाही या चौघांनी मारहाण केली. ४‘आम्ही एस.पी. आॅफिसचे स्पेशल सीआयडी स्क्वाड आहोत,’ असे सांगून त्यांनी रोकडसह हबीब व वाहिद यांना जबरदस्तीने गाडीत घेऊन कोल्हापूरचा रस्ता धरला. अशी झाली डील ४दुपारी अडीचच्या सुमारास वाटेवरील प्रवासातच ‘खंडणी’ची बोलणी सुरू होती. २५ लाखांचा सौदा पाच लाखांवर आला. तोपर्यंत गाडी कागलजवळ पोहचली होती. ४दुपारी चारच्या सुमारास एस. पी. आॅफिसच्या दारात फिरवून ‘ती’ गाडी त्यांनी त्याच आवारातील न्यायालयाच्या आवारात नेली. ४एकजण गाडीजवळ थांबला, तर तिघेजण एस.पी.साहेबांना भेटून येतो, म्हणून तेथून निघाले. काही वेळाने ते तिघेही परत गाडीजवळ आले. तोपर्यंत त्यांनी ‘सोबत’ नेलेली रक्कम मोजून घेतली होती. ४संपूर्ण रक्कम ३ लाख ८७ हजार होती. उर्वरित १ लाख १३ हजार रुपये कोल्हापुरातच द्या, लगेच सोडतो असे त्यांनी मॅनेजर अब्दुलवाहिदला सांगितले. ४आम्हाला गडहिंग्लजला घेऊन चला. कुणाकडून तरी उसने घेऊन देतो, असे हबीबनी सांगितले. त्यांचे सांगणे ‘त्यांना’ पटल्यामुळे ‘त्यांनी’ पुन्हा गडहिंग्लजला येण्याची तयारी दाखवली. प्रत्येकी सव्वा लाखाचा ‘आंबा’ पडल्याच्या आनंदात चौघेही होते. येथे ते फसले ४‘शिवराज’जवळ आल्यानंतर मोबाईल द्या, कुणाशी तरी बोलून पैसे मागवून घेतो, असे हबीबनी त्यांना सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी मोबाईल दिला अन् ‘ते’ फसले. ४दरम्यान, घरातील लोकांनी पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक रामदास इंगवले व उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे यांना या घटनेची माहिती दिली होती. ४त्यांनीही कोल्हापुरात सगळीकडे फोनाफोनी करून गडहिंग्लजला स्क्वाड वगैरे पाठवले आहे का ? याची चौकशी केली होती. मात्र, कुठेही त्यांना दुजोरा मिळाला नव्हता. ४मोबाईल मिळताच हबीब यांना सद्दामहुसेनचा फोन आला. आम्ही शिवराज कॉलेजजवळ असून लगेच या असे त्यांनी सांगितले. ४हीच माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस अधिकारी इंगवले व दिवटे आपल्या गाड्या घेऊन दाखल झाले. अन्य नागरिकांनीही आपल्या चारचाकी व दुचाकी आडव्या लावून ‘लाल’ गाडीची ‘वाट’ अडवली होती. ४इंगवले यांनी अधिकाराचा हिसका दाखवून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. तोपर्यंत संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. लाखाच्या डावात सुपीक डोक्याचा तमिळी व्यापारी जिंकला. ‘चोर’ पोलीस हरले. गुन्हा नोंद करण्यास विलंब ४कायदा जनतेच्या इच्छाशक्तीचे प्रतीक असतो, म्हणूनच जे लोक कायद्याला मान देतात, त्यांना आम्ही मान देतो, असा सुविचार लिहिलेल्या फलकामागील खोलीतच ‘त्या’ चारही पोलिसांना रात्रभर बसवण्यात आले. स्थानिक साहेबांपासून जिल्ह्याच्या साहेबांपर्यंत तिघांनीही तासा-तासाने बंद खोलीत ‘आरोपी’ व ‘फिर्यादी’ यांची स्वतंत्रपणे झाडाझडती घेतली. ४मात्र, दुपारी दीडच्या सुमारास घडलेल्या घटनेची फिर्याद नोंदविण्यास ‘रात्री’चे दीड का वाजविले, तक्रारदारांना तासन्तास तिष्ठत ठेवून खंडणी उकळायला आलेल्या ‘चोर’ पोलिसांना ‘व्हीआयपी’ ट्रीटमेंट का दिली, याचीही चर्चा शहरासह तालुकाभर होती. शहर व तालुक्याची शांतता व सलोखा कायम ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणार्या पत्रकारांनाही बातमीसाठी रात्रीचा एक वाजेपर्यंत तिष्ठत बसावे लागले. दीडच्या सुमारास फिर्याद नोंदविण्यात आली. ४गंभीर गुन्ह्याची पार्श्वभूमी असताना केवळ खंडणीचे कलमच का लावले? पोलीस आरोपीच्या पिंजर्यात आल्यानंतरही त्यांना इतर आरोपींप्रमाणे का वागवले नाही? जनतेच्या रक्षणाची जबाबदारी वाहणारे पोलीस असे बेछूट का वागतात? त्यांना नैतिकतेचे धडे कोण देणार? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
पोलीसच चोर; अब्रू टांगली वेशीवर
By admin | Updated: June 1, 2014 01:22 IST