लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘अति घाई संकटात नेई’ या उक्तीप्रमाणे अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे अपघातांच्या घटनेत वाढ होत आहे, वाढत्या दुर्घटना रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस दलाला ‘स्पीडगन व्हॅन’ दिली. वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात या ‘स्पीडगन व्हॅन’ने सुमारे ४,३५४ वाहनांचा वेग रोखला. वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने टिपून त्या वाहनमालकाला एक हजार रुपयांचा ‘फाईन’ बसल्याने वाहनांची वेगमर्यादा नियंत्रणात आली आहे.
सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला घाई ठरलेलीच आहे. त्यातच वाहन उत्पादक कंपन्यांनी अतिवेगवान वाहनांची निर्मिती केली. त्यामुळे रस्त्यावर सध्या धूमस्टाईलने धावणारी वाहने नजरेत भरत आहेत. वेगाचे उल्लंघन करणारी वाहने टिपण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस दलाला ‘स्पीडगन व्हॅन’ दिली आहे.
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दिनांक १९ नोव्हेंबर २०१९ रोजी ही ‘स्पीडगन व्हॅन’दाखल झाली. त्याचे नियंत्रण शहर वाहतूक शाखेकडे दिले. पहिले काही दिवस ‘स्पीडगन व्हॅन’ समजून घेण्यात गेले, नंतर जानेवारी २०२०मध्ये तितक्याच जोमाने ‘स्पीडगन व्हॅन’ कामाला लागली. फक्त जानेवारीतच तब्बल १,९९६ वाहनांचे स्पीड नियंत्रणात आले. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल ते जुलैमध्ये लॉकडाऊनमध्ये ‘स्पीडगन’ची कारवाई थांबली. त्यानंतर पुन्हा अतिवेगवान धावणाऱ्या वाहनांवर ‘स्पीडगन’ने नियंत्रण मिळवले.
२०२० मध्ये ‘स्पीडगन व्हॅन’ची वाहनांवर कारवाई
- जानेवारी : १,९९६
- फेब्रुवारी : २८५
- मार्च : ५४२
- एप्रिल : -
- मे : -
- जून : -
- जुलै : -
- आॅगष्ट : १४८
- सप्टेंबर : १२३
- आॅक्टोबर : २९५
- नोव्हेंबर : ९२५
- डिसेंबर : ४०
धावत्या वाहनांची मोजली जाते स्पीड
महामार्ग अगर शहरातील मोठ्या रस्त्यांवर वाहनांचे स्पीड निश्चित केले आहे. अतिवेगवान वाहनांना किमान एक किलोमीटर अंतरावरुन ‘स्पीडगन’ टिपते. त्या वाहनावर ‘स्पीडगन’चे लेझर किरण पाडून त्या वाहनाची वेगमर्यादा मोजली जाते. वेगाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनमालकांना दुसऱ्या दिवशी ई-चलन मेसेजद्वारे मोबाईलवर एक हजार रुपये दंडाची नोटीस जाते. अशा पध्दतीने पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याचा वॉच आपल्यावर असल्याचे वाहनधारकांच्या लक्षात येते.
कोट...
‘स्पीडगन’मुळे वेगाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना दुसऱ्या दिवशी एक हजारांचा फाईन बसत असल्याने प्रत्येक चालकाचे आपल्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण राहते. परिणामी संभाव्य दुर्घटनांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होते. - स्नेहा गिरी, पोलीस निरीक्षक, कोल्हापूर शहर वाहतूक शाखा.