मलकापूर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा गजर करीत, पारंपरिक लेझीम, ढोल-ताशे यांच्या गजरात शाहूवाडी तालुक्यात गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासन व पोलीस प्रशासनाने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना विशेष सतर्कता घेण्याची सूचना दिली होती. शासनाच्या नियमास बांधील राहूनच यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्याच्या सक्त सूचना दिल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुका न काढता शांततेत गणपती बाप्पांचे विसर्जन केले.
बांबवडे, आंबा, करंजपेण, शाहूवाडी येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी डॉल्बीला फाटा देऊन शांततेच्या मार्गाने गणेशाचे विसर्जन केले. शाहूवाडी पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केला होता, तर मलकापूर नगर परिषदेच्यावतीनेही कडवी शाळी नदीघाटावर विशेष सतर्कता घेतली होती.