रांगडेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या मुलींच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसकाही तसा रांगडाच. त्यांच्या बोलण्या, वागण्यातील जरब येथे गल्लोगल्ली दिसते. त्यामुळे कोल्हापूरच्या मुलींची ओळखही वेगळीच आहे. त्या शिक्षण, स्पर्धा परीक्षेत आपला ठसा उमटवित आहेत. क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र आणि कुस्तीचे आखाडे गाजवत आहेत. येथील मुली आता पदोपदी आव्हानांचा सामना कराव्या लागणाऱ्या पोलीस क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजविण्यास वेगाने पुढे येताना दिसत आहेत. कमी वयात सरकारी नोकरीची शाश्वती, वर्दीचे आकर्षण आणि वेगळे करून दाखविण्याची धमक, कष्ट करण्याची तयारी यामुळे पोलीस दलात भरती होणाऱ्या मुलींची संख्या वाढतच चालली आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुली आघाडीवर असल्याने कोल्हापूरची वेगळी ओळख रूढ होऊ लागली आहे.
सध्या त्यांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत असून, त्यामध्ये अधिकतर मुली या ग्रामीण भागातील आणि १८ ते २५ वयोगटामधील आहेत. गेल्या सात वर्षांपासून पोलीस भरतीकडे मुलींचा कल वाढला आहे. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे ७० हजार जण या भरतीची तयारी करतात. त्यामध्ये सुमारे १४ हजार इतकी मुलींची संख्या असते. जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागातील आणि शालेय, महाविद्यालयात कबड्डी, जिम्नॅस्टिक, खो-खो, ॲथलेटिक्स, हॅण्डबॉलच्या खेळाडू असलेल्या मुलींचे प्रमाण अधिक आहे. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यांतील मुलींची संख्या जादा आहे. शेतकरी, मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबातील या मुली आहेत. त्यातील अनेक मुली या पदवीचे शिक्षण घेत, घरकाम सांभाळून पोलीस भरतीची तयारी करत आहेत. शाहूवाडी, चंदगड, गडहिंग्लजमधील मुली या शहरात राहून, तर करवीर, पन्हाळा तालुक्यांतील मुली या रोज २० ते २५ किलोमीटरचा प्रवास करून तयारीसाठी कोल्हापूर शहरात येतात. काही मुली या डाटा एंट्री ऑपरेटर, रिसेप्शनिस्ट, मार्केटिंग, आदी कामे करून पोलीस भरतीची तयारी करत आहेत. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींच्या वाढत्या प्रमाणामुळे कोल्हापूरची नवी ओळख निर्माण झाली आहे.
तयारी करणाऱ्या मुली काय म्हणतात?
मी शेतकरी कुटुंबातील आहे. पोलीस होण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न आहे. सध्या मी पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. गेल्या तीन वर्षांपासून मी भरतीची तयारी करत आहे. भरतीतील मुलींचा टक्का आणखी वाढविण्यासाठी शासनाने त्यांना कॉलेजपातळीवरूनच याबाबत शिक्षण, प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी.
-पल्लवी खोत, वड्डवाडी-दऱ्याचे वडगाव
माझे काका हे पोलीस दलात असल्याने या क्षेत्रात करिअर करण्याचे माझे स्वप्न आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी तयारी करत आहे. शिक्षण घेत आम्ही मुली अभ्यास, सराव करत आहोत; पण भरती प्रक्रियेला होणारा विलंब आमच्यासाठी मारक ठरत आहे. शासनाने वेळेत भरती प्रक्रिया राबवावी.
- मानसी पाटकर, हेरे (ता. चंदगड)
रिंगटेनिसची मी खेळाडू असल्याने पोलीस दलात भरती होण्याचे मी ठरविले. गेल्या दोन वर्षांपासून तयारी करत आहे. बहुतांश मुली बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर भरतीची तयारी सुरू करतात. त्यांच्याकडे पदवीपर्यंतची तीन वर्षे असतात. या कालावधीत जाहीर होणाऱ्या पदांची भरती वेळेत झाली, तरच त्यांना उपयुक्त ठरते. अन्यथा त्यांचे कष्ट वाया जाते, भरतीचे स्वप्न अधुरे राहते. त्यामुळे शासनाने भरती प्रक्रिया वेळेत राबवावी.
- स्वप्नगंधा भोसले, पन्हाळा
प्रशिक्षक काय सांगतात?
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आणि भरती होणाऱ्या मुलींची संख्या कोल्हापूर जिल्ह्यात वाढत आहे. बारावी उतीर्ण, क्रीडा क्षेत्राशी संबंधित आणि ग्रामीण भागातील मुलींचे प्रमाण अधिक आहे. मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी भरती प्रक्रिया शासनाने वेळेत राबविणे आवश्यक आहे.
- अभय पाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर दोन - तीन वर्षे तयारी केल्यावर शासकीय सेवेत करिअर घडत असल्याने मध्यमवर्गीय, सर्वसामान्य कुटुंबांतील मुलींचा पोलीस भरतीकडे कल वाढला आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापुरातील प्रमाण चांगले आहे. कुटुंबीयांचे मिळणारे पाठबळही त्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे.
- भरत कांबळे, पोलीस भरती प्रशिक्षक
चौकट
रोज कसून सराव
पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी असते. त्यात यशस्वी होण्यासाठी पक्की तयारी करणे आवश्यक असते. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या मुली या रोज सकाळी तीन तास प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करतात. त्यात १०० मीटर, ८०० मीटर धावणे, गोळाफेक यांचा सराव असतो. त्यानंतर तीन ते चार तास लेखी परीक्षेचा अभ्यास करतात. या भरतीच्या तयारीसाठी एक मुलगी वर्षाला सरासरी ६० हजार रुपये खर्च करते. त्यात लेखी परीक्षेच्या क्लासेसची वर्षाची पाच हजार रुपये, फिजिकल (शारीरिक चाचणी)साठी सहा हजार रुपये खर्च होतो. प्रवास, निवास, आदींचा दरमहा साडेतीन ते चार हजार रुपये खर्च होतो.
चौकट
तयारीची कसरत
बहुतांश मुली या ग्रामीण भागातील असल्याने घरकामात, आई-वडिलांना शेतीच्या कामात मदत करून, शिक्षण सांभाळत त्या पोलीस भरतीची तयारी करतात. त्यांना अशा पद्धतीने तयारीची एकप्रकारे कसरत करावी लागते.
चौकट
तीन वर्षेच मिळते संधी
बारावीनंतर पदवीपर्यंतची तीन वर्षे पोलीस भरती होण्यासाठीची संधी अनेक मुलींना कुटुंबीयांकडून मिळते. या तीन वर्षांमध्ये भरती नाही झाली, तर पालक हे त्यांच्या मुलीचे लग्न करून देतात. लग्नानंतर सासरी राहून काही मुली भरतीची तयारी करतात; पण त्यांचे प्रमाण कमी आहे. लग्न झाले की, अनेक मर्यादा येतात. त्यामुळे शासनाने भरतीची प्रक्रिया वेळेत राबविणे आवश्यक आहे, तरच पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांचा टक्का वाढणार आहे.
चौकट
पदे रिक्त राहत नाहीत
आतापर्यंत ज्या-ज्या वेळेस राज्यात पोलीस भरती झाली आहे, त्याठिकाणी महिलांसाठी असणारी पदे भरली आहेत. ती रिक्त राहिलेली नाहीत. त्यावरून मुलींचा पोलीस भरतीकडील कल स्पष्ट होतो.
फोटो (१६०१२०२१-कोल-पल्लवी खोत (पोलीस भरती), मानसी पाटकर (पोलीस भरती), स्वप्नगंधा भोसले (पोलीस भरती)