आरवली : कोल्हापूर उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यात आले नव्हते. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीतर्फे विभागीय उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले. यावेळी उपोषणकर्त्यांना कोल्हापूरचे उपसंचालक गोंधळी यांनी तातडीने सरसकट मूल्यांकन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. आणि तसे आदेशही संबंधीत पाचही जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत.२४ फेब्रुवारी २०१४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘कायम’ शब्द वगळून अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यासाठी आॅनलाईन पद्धतीने मुल्यांकन करण्यात आले व यानंतर प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पथक नेमून प्रत्यक्ष आॅनलाईन स्वरुपात भरलेली माहिती योग्य आहे की नाही हे पाहून संबंधित कनिष्ठ महाविद्यालय पात्र की अपात्र आहे हे ठरणार होते. राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेला चमू प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात पोहोचला. परंतु, कोल्हापूर विभागांतर्गत येणाऱ्या सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शासन निर्णयाला पाने पुसत कनिष्ठ महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी न देता अपात्र ठरविले. यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत या प्रक्रियेकडे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. या निषेधार्थ पाचही जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी कोल्हापूर येथील विभागीय उपसंचालक कार्यालय येथे आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत उपसंचालक गोंधळी यांनी चर्चेसाठी बोलावून कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या व्यथा जाणून घेतल्या. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य विना अनुदानित कृ ती समितीतर्फे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.शासन जोपर्यंत विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना प्रत्यक्षात अनुदान देत नाही व मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलने केली जाणार आहेत. यामध्ये ३१ आॅगस्टला पुणे संचालक कार्यालयावर आंदोलन, त्यानंतर ५ सप्टेंबरला विनाअनुदानित प्राध्यापक ‘काळा दिन’ साजरा करणार आहेत. १५ सप्टेंबरला आझाद मेदानावर धरणे आंदोलन तर ११ नोव्हेंबरपासून आझाद मैदानावरच उपोषण करणार आहेत. आंदोलनावेळी विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृ ती समितीचे अध्यक्ष टी. एम. नाईक, रत्नाकर माळी, गौरव पोंक्षे, शिवभूषण नामजोशी, संदीप कुराडे, अभिजीत सुर्वे, विपुल देसाई, अभिजीत सहस्त्रबुद्धे, माजी आमदार भगवान साळुंखे उपस्थित होते. (वार्ताहर)
महाविद्यालयांचे सरसकट मूल्यांकन
By admin | Updated: August 19, 2015 22:52 IST