येथील विद्याभवनमधील सभागृहात सकाळी अकरा वाजता मुख्याध्यापक संघाची ७६ वी वार्षिक सभा सुरू झाली. अध्यक्ष सुरेश संकपाळ यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी वर्षभरातील कामाचा आढावा सादर केला. सचिव दत्ता पाटील यांनी विषयांचे वाचन केले. त्यांनी जमाखर्च पत्रकाच्या मंजुरीचा विषय मांडला. त्यावर रत्नाकर बँकेत संघाच्या शिल्लक असलेल्या रकमेवर व्याज का मिळाले नाही, असा सवाल विरोधी गटातील आर. वाय. पाटील यांनी उपस्थित केला. लॉकडाऊनच्या कालावधीत केवायसीची पूर्तता केली नसल्याने व्याज मिळाले नसून, त्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे दत्ता पाटील यांनी सांगितले. वर्गणी जमा करूनही मुख्याध्यापक महामंडळाच्या एज्युकेशन जर्नलचे वितरण का झाले नाही, अशी विचारणा के. के. पाटील यांनी केली. लॉकडाऊनमुळे या जर्नलच्या वितरणावर मर्यादा आली असल्याचे सुरेश संकपाळ यांनी सांगितले. त्यानंतर बजेटपेक्षा जादा झालेला खर्च, सन २०२०-२१ चे अंदाजपत्रक विषय मांडताच सत्ताधारी गटाच्या समर्थकांनी मंजूर-मंजूरच्या घोषणा दिल्या. दत्ता पाटील यांनी नवीन कार्यकारिणी निवडीचा विषय मांडताच त्यासाठी रीतसर प्रक्रिया राबविली नसल्याचे सांगत विरोधकांतील व्ही. जे. पोवार, आर. वाय पाटील, आदींनी या विषयाला विरोध केला; पण हात उंचावून मतदान घेण्यावर सत्ताधारी ठाम राहिले. त्यातून वादावादी आणि खडाजंगी झाली. त्यात विरोधकांतील काहींनी व्यासपीठावर जाऊन माईक ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना समर्थकांनी रोखले. व्यासपीठाखाली दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये हमरी-तुमरी, ढकलाढकली सुरू झाली. विरोधकांनी ‘हुकूमशाही, दडपशाहीचा धिक्कार असो’ अशा, तर सत्ताधाऱ्यांनी ‘लोकशाहीचा विजय असो’ अशा घोषणा सुरू केल्या. त्यातच सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी हात उंचावून मत नोंदवत नवीन कार्यकारिणी निवडीचा विषय मंजूर केला. या गोंधळात सभा संपली.
विरोध झुगारून नवी कार्यकारिणी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST