गणपती कोळी - कुरुंदवाड -पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील सर्वांत मोठे असलेल्या येथील कृष्णा वेणी यात्रेतील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. शेतकऱ्यांना शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी व जनावरांची देवाण-घेवाण व्हावी या उद्देशाने सुमारे सत्तर वर्षांपूर्वीपासून सुरू असलेली पशू व कृषी प्रदर्शनाची परंपरा आजही सुरू आहे. या प्रदर्शनातील पशू तर गायब झालेच आहेत. मात्र, प्रदर्शनही नावापुरतेच राहिले आहे. पालिकेकडून या प्रदर्शनाचे नियोजन केले जात असून, याला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी यात्रा समितीने लक्ष घालण्याची गरज आहे.यात्रा व प्रदर्शनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, चिक्कोडी, अथणी, निपाणी, बेळगाव, आदी भागांतील शेतकरी बैलगाडीने यात्रेस येत. त्यांचा चार दिवस मुक्काम होत असे. नगरपालिकेच्या स्थापनेनंतर या यात्रेचे नियोजन पालिकेकडे आले. यात्रा समितीकडून यात्रेकरूंची सर्व प्रकारची सोय केली जात असे.मात्र, परिस्थिती बदलली. प्रत्येक भागात शेती प्रदर्शन भरत असल्याने व आधुनिक तंत्रज्ञानाने जनावरांची संख्याही घटत आहे. वाहतुकीची निर्माण झालेली साथ, साधने व माणसाला वेळही नसणे, आदी कारणांमुळे यात्रेबरोबरच पशू व कृषी प्रदर्शन केवळ नावापुरतेच राहिले आहे.प्रदर्शनामध्ये विक्रमी शेतीच्या पिकांचे नमुने ठरावीक शेतकरीच आणून ठेवत आहेत. बैलांची संख्याही घटली आहे. त्यामुळे पशू प्रदर्शन गायब झाले असून, केवळ औपचारिक पद्धतीने जातिवंत बैलांची निवड केली जाते. एकूणच जनावरांची घटती संख्या, जागेची कमतरता, नियोजनाचा अभाव, चाऱ्याची टंचाई, आदींमुळे प्रदर्शन लोप पावत असून, याला पुन्हा ऊर्जितावस्था निर्माण करून देण्यासाठी पालिका पदाधिकारी यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. यात्रेकरूंना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच पशू व कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त भाग घेण्यासाठी आकर्षक बक्षीस योजना राबविणे, त्यासाठी समिती पदाधिकाऱ्यांनी वेळ दिल्यास व नियोजनबद्ध, राजकारणविरहित उपक्रम राबविल्यास यात्रेतील पशू व कृषी प्रदर्शन पुन्हा कात टाकल्याशिवाय राहणार नाही.प्रत्येक गावात कोणत्यातरी देवाच्या नावाने यात्रा भरवली जाते. मात्र, कुरुंदवाडमधील यात्रा याला अपवाद आहे. कृष्णाकाठी असलेल्या या शहरात प्रत्येकवर्षी महाशिवरात्रीनिमित्त कृष्णावेणी यात्रा भरविण्याची पद्धत संस्थान काळापासून चालू आहे. पूर्वी शेती प्रदर्शन भरले जात नव्हते अन् कुरुंदवाड हे कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने या भागातील शेतकऱ्यांना शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान व्हावे, विक्रमी उत्पन्न घेतलेल्या पिकांचे दर्शन व्हावे, जातिवंत बैल, गाय, म्हैस व शेळ्यांची प्रदर्शनाच्या माध्यमातून खरेदी-विक्री व्हावी या उद्देशाने येथील चिंतामणराव पटवर्धन सरकारांकडून १९४३ पासून पंचगंगा-कृष्णा घाट रस्त्यावर सुमारे दीडशे एकर क्षेत्रावर हे प्रदर्शन भरवले जात होते.
कुरुंदवाडच्या यात्रेस गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज
By admin | Updated: February 23, 2015 00:21 IST